जीएमसीत आजपासून कोविडसाठी ८२ अतिरिक्त बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:15 AM2021-03-15T04:15:52+5:302021-03-15T04:15:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविडचे तीन कक्ष सोडून कक्ष क्रमांक ७ ते ९ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविडचे तीन कक्ष सोडून कक्ष क्रमांक ७ ते ९ दरम्यान अतिरिक्त ८२ बेडची कोविड रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली असून सोमवारपासून हे तिन्ही कक्ष सेवेत येणार आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रविवारी दुपारी या ठिकाणी पाहणी करून सूचना दिल्या.
गेल्या दीड महिन्यापासून कोरोना संसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जागेच्या अडचणींचा विषय काही दिवसांपासून समोर आला होता. अशा स्थितीत जीएमसीत असलेली १२१ बेडची व्यवस्थाही अपूर्ण असल्याने या ठिकाणी मुख्य इमारतींध्ये दोन भागात कोविड आणि नॉन कोविड करण्यासंदर्भात आठवडाभर पूर्वीपासून नियोजन सुरू करण्यात आले होते. यासाठी कक्ष ७, ८ व ९ मधील रुग्णांना हळू हळू डिस्चार्ज देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या होत्या. त्यानुसार हे कक्ष खाली झाल्यानंतर रविवारी पुन्हा एकदा यांची पाहणी करून अखेर सोमवारपासून हे ८२ बेड आता कोविड रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहे. या ठिकाणी ऑक्सिजन पाईपलाईनची व्यवस्था आहे.
मनुष्यबळ दिले
कोविडसाठी बेड वाढविले तरी मनुष्यबळाच्या कमतरतेचा मुद्दा मात्र कायम होता. त्यापार्श्वभूमीवर या ठिकाणी आयुर्वेदचे ७ डॉक्टर व १९ परिचारिका या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. सोमवारी ही सेवा सुरू होणार आहे.
कक्ष १२ मध्येही पाहणी
आगामी काळात रुग्ण वाढल्यास आणखी कक्ष वाढवावे लागणार आहे. त्यासाठी कक्ष १२ मधील जे काही रुग्ण असतील त्यांनाही टप्प्याटप्प्याने डिस्चार्ज देऊन हा कक्षही कोविडसाठी सुरू करण्याचे नियोजन सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अशी आहे बेडची स्थिती
सी १ : २०
सी २ : ७२
सी ३ : २९
जीएमसी मुख्य इमारत तीन कक्ष : ८२