जळगाव जिल्ह्यात वाढणार ८५ मतदान केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:12 PM2019-03-17T12:12:24+5:302019-03-17T12:13:14+5:30
प्रस्ताव आयोगाला सादर
जळगाव : लोकसभा निवडणुकीत मतदारांच्या सोयीसाठी जिल्ह्यात ८५ सहाय्यकारी मतदान केंद्र वाढीचा प्रस्ताव आयोगाला पाठविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
विधानसभा मतदार संघ निहाय सहाय्यकारी मतदान केंद्र, मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल आणि मतदान केंद्रांच्या नावात बदलाबाबतची माहिती देण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांच्योसह विविध राजकिय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दोन किलो मिटरची मर्याद
मतदाराला मतदानासाठी दोन किलोमीटरपेक्षा अधिक अंतर जावे लागू नये, तसेच ग्रामीण भागातील ज्या मतदान केंद्रावर १२०० पेक्षा अधिक तर शहरी भागात १४०० पेक्षा अधिक मतदार असतील, अशा ठिकाणी सहाय्यकारी मतदान केंद्र वाढीचा प्रस्ताव आयोगाला पाठविण्यात येत असल्याची माहिती डॉ. ढाकणे यांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार जिल्ह्यात ८५ सहाय्यकारी मतदान केंद्र वाढीचा प्रस्ताव आहे.
मतदान केंद्रांच्या जागेत बदल... त्याचप्रमाणे मतदान केंद्रांची इमारत अथवा खोली बदलल्यामुळे जिल्ह्यातील ६० मतदान केंद्रांच्या ठिकाणात तर ९९ मतदान केंद्रांच्या नावात बदल करण्याचेही प्रस्तावित आहे. मतदान केंद्र वाढीच्या प्रस्तावामुळे जिल्ह्यात आता ३५३२ ऐवजी ३६१७ मतदान केंद्र होणार आहे. विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्राची संख्या पुढीलप्रमाणे. जळगाव शहर ३९३, रावेर ३१९, जळगाव ग्रामीण ३३६, भुसावळ ३१५, पाचोरा ३३०, जामनेर ३२८, अमळनेर ३२३, मुक्ताईनगर व चोपडा प्रत्येकी ३२१, चाळीसगाव ३४१ तर एरंडोल २९० इतकी होणार आहे.