स्वच्छता मोहिमेंतर्गत ८५ टन कचरा जमा
By admin | Published: March 2, 2017 12:24 AM2017-03-02T00:24:05+5:302017-03-02T00:24:05+5:30
अमळनेर/पारोळा : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी विविध भागात केली स्वच्छता
अमळनेर/पारोळा : शासकीय कार्यालयांमध्ये कागदांचे तुकडे, इतर कचरा पडलेला असतो. वरवर स्वच्छता केली जाते मात्र डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यामार्फत आज विविध शासकीय कार्यालयांत स्वच्छता मोहीम राबवून तब्बल ८५ टन कचरा संकलित करण्यात आला. या मोहिमेमुळे शासकीय कार्यालये व त्यालगतचा परिसर चकाचक झाला.
अमळनेर
अमळनेरात नगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम चांगल्यापैकी राबवली जात आहे. त्यामुळे अनेक भागांतील कचरा उचलण्यात आलेला आहे. दुभाजकालगतची मातीही उचलण्यात आलेली आहे. मात्र, शासकीय कार्यालयांमधील स्थिती यापेक्षा वेगळी आहे. शासकीय कार्यालयांमध्ये वरवर स्वच्छता केली जाते. कार्यालयांबाहेर कागदांचे तुकडे पडलेले असतात, गटारीही तुंबलेल्या असतात. त्यामुळे आवार स्वच्छ दिसत असला तरी परिसरात सर्वत्र कचरा दिसतोच.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडाच्या स्वयंसेवकांनी आज सकाळी आठ वाजेपासून स्वयंस्फुर्तीने स्वच्छता मोहिमेस सुरुवात केली. या स्वयंसेवकांनी हातात झाडू घेऊन, शासकीय कार्यालये, त्यालगतचा सर्व परिसर चकाचक केला. या स्वयंसेवकांनी कोरड्या नाल्यांमध्ये उतरून, तेथील कचराही संकलित केला. एकाच वेळी अनेक स्वयंसेवक विविध भागांत स्वच्छता करीत असल्याचे बघून अनेकांनी समाधान व्यक्त केले.
या मोहिमेंतर्गत पोलीस स्टेशन, न्यायालय, प्रांताधिकारी, तहसील कार्यालय, बसस्थानक, ग्रामीण रुग्णालय, रेल्वे स्टेशन, भूनगररचना कार्यालय व शहरातील प्रमुख रस्त्यांवर ही मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेत जवळपास ९०० स्वयंसेवक सहभागी झाले होते. कचरा संकलित करण्यासाठी १७ ट्रॅक्टर व दोन जेसीबीचा वापर करण्यात आला.
यात २४ टन ओला तर ३४ टन कोरडा कचरा संकलित करण्यात आल्याचे कळवण्यात आले आहे.
पारोळा
येथेही आज स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानाचे उद्घाटन आमदार डॉ. सतीश पाटील, नगराध्यक्ष करण पवार, गटविकास अधिकारी आर. के. गिरासे यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरात ४६४ स्वयंसेवकांनी पंचायत समिती, न्यायालय, पोलीस स्टेशन, बसस्थानक, अमरधाम, अमळनेर रोड, गिरीपार्क, आझाद चौक, लवन गल्ली, जडे गल्ली, बहिरम गल्ली, झपाट भवानी चौक आदी परिसरात ही मोहीम राबवत ओला व कोरडा कचरा मिळून २७.५ टन कचरा संकलित केला. (वार्ताहर)
हातात झाडू, पावडी घेत स्वयंसेवक दाखल झाले. त्यांनी शहराच्या विविध भागात तसेच शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन परिसराची स्वच्छता केली. एकाच वेळी अनेकांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
स्वयंप्रेरणेने स्वच्छतेचे काम करणाºया या स्वयंसेवकाचे अनेकांनी कौतुक केले. या स्वच्छता मोहिमेमुळे शासकीय कार्यालयांचा परिसर चकाकून गेला होता.