महापौरांच्या अखेरच्या महासभेत तब्बल ८५ विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:17 AM2021-02-24T04:17:19+5:302021-02-24T04:17:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - महापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १८ मार्च रोजी संपणार असून, त्याआधीच शहरातील महत्त्वाच्या विषयांना मंजुरी ...

85 topics in the last general meeting of mayors | महापौरांच्या अखेरच्या महासभेत तब्बल ८५ विषय

महापौरांच्या अखेरच्या महासभेत तब्बल ८५ विषय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - महापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १८ मार्च रोजी संपणार असून, त्याआधीच शहरातील महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे. २६ रोजी महापालिकेच्या दोन महासभांचे आयोजन केले आहे. महासभेच्या मंजुरीसाठी तब्बल ८५ विषय अजेंड्यावर ठेवण्यात आले आहेत. भारती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही महासभा अखेरची राहण्याची शक्यता आहे. ११ वाजता नियमित महासभा होणार असून, या महासभेत एकूण ३० तर त्यानंतर दुपारी १२ वाजता विशेष महासभेचे आयोजन केले आहे. यामध्ये एकूण ५५ विषय महासभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

गेल्या ऑनलाइन महासभेत कनेक्टिव्हिटीला समस्या आल्यामुळे महासभा सभागृहात घेण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे पुढील महासभा सभागृहात होण्याची शक्यता होती; मात्र जिल्ह्यासह संपूर्ण शहरातदेखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महासभा ही ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात येणार आहे. महासभेत तब्बल ८५ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.

एका दिवसात मंजुरीसाठी ठेवण्यात आलेले सर्वाधिक विषयांचा रेकॉर्ड

महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणारी अखेरची महासभा राहणार असल्याने, त्यातच कोरोनाचा वाढत जाणारा प्रादुर्भाव पाहता, सत्ताधाऱ्यांनी एकाच दिवशी जास्तीत जास्त विषय उरकण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेची स्थापना २००३ मध्ये झाल्यानंतर आतापर्यंत झालेल्या महासभांमध्ये एकाच दिवशी ८५ विषय अजेंड्यामध्ये आलेले नाहीत. २६ रोजी ऑनलाइन महासभा ही रेकॉर्डब्रेक ठरणार आहे. विशेष म्हणजे ८५ पैकी ११ विषय हे प्रशासकीय असून, यामध्ये ७४ विषय हे अशासकीय आहेत, तसेच आयत्या वेळेच्या विषयातदेखील अनेक विषय मांडले जाणार आहेत. त्यामुळे शुक्रवारची महासभा ही मॅरेथॉनच ठरणार आहे.

प्रशासनाकडून आलेले महत्त्वाचे विषय

१. शहरात सुरू असलेल्या अमृत अंतर्गत पाणी पुरवठा योजनेत ज्या भागांचा समावेश नव्हता, त्या १६५ कॉलन्यांमधील कामासाठी महापालिकेने ३० कोटींची तरतूद केली असून, हा विषय महासभेत ठेवण्यात आला आहे.

२. शिवाजी उद्यानातील जे. के. डेव्हलपर्सला भाडे तत्त्वावर दिलेली जागा ताब्यात घेण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून सादर करण्यात आला आहे.

३. पिंप्राळा भागातील जागा भूसंपादित करण्याचे प्रस्ताव महासभेत सादर करण्यात आला आहे. अग्निशमन अत्याधुनिक साहित्य व उपकरणे खरेदीबाबतचा जिल्हा नियोजन विभागाला ४९ लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून आला आहे.

अशासकीय प्रस्ताव

१. सप्टेंबर महिन्यात ४५ कोटींच्या मनपा फंडातून शहरातील रस्त्यांच्या होणाऱ्या कामाचे अंदाजपत्रक रद्द करून, आता नव्याने २५ कोटींची भर टाकून ७० कोटींच्या कामांचे नवीन अंदाजपत्रक आता तयार केले जाणार आहे.

२. महापौर, उपमहापौर व मनपा विरोधी पक्ष नेत्यांसाठी मनपा फंडातून वाहन खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात आला आहे.

३. राज्य शासनाने स्थगिती दिलेल्या ४२ कोटींच्या निधीबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्याबाबत व दाद मागण्यासाठीचे अधिकार सभागृहातील सदस्यांना प्रदान करण्याबाबत ॲड. शुचिता हाडा यांनी प्रस्ताव सादर केला आहे.

४. नव्याने होत असलेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत नवनाथ दारकुंडे व मराठी प्रतिष्ठानकडून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

Web Title: 85 topics in the last general meeting of mayors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.