नियमित मोफत धान्याचे ८८ टक्के वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:12 AM2021-06-01T04:12:48+5:302021-06-01T04:12:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांमुळे अनेकांच्या हातचे काम गेल्याने त्यांचा उदरनिर्वाह सुरू राहावा यासाठी देण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांमुळे अनेकांच्या हातचे काम गेल्याने त्यांचा उदरनिर्वाह सुरू राहावा यासाठी देण्यात येणाऱ्या नियमित मोफत धान्याचे जिल्ह्यात ८८ टक्के वाटप झाले आहे. यासोबतच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचेदेखील ६४ टक्के धान्य लाभार्थींना वाटप झाले आहे.
कोरोनाचा संसर्ग उद्भवला व त्यामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अनेक व्यवसाय बंद झाले. त्यामुळे गरजूंपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी राज्य सरकारने दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना मोफत धान्य देण्याची घोषणा केली. यामध्ये मे महिन्याच्या अखेरपर्यंत हे धान्य मोफत दिले जाणार होते. त्यानुसार जिल्ह्यात मे महिन्यात ८८ टक्क्यांपर्यंत मोफत धान्य वाटप झाले आहे. जिल्ह्यासाठी १५ हजार ७२५ मेट्रिक टन धान्य प्राप्त झाले होते. यातील १३ हजार ९७४ मेट्रिक धान्य लाभार्थींना वितरित झाले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचाही लाभ
नियमित मोफत धान्यासोबतच मे महिन्यामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभदेखील जिल्ह्यातील लाभार्थींना देण्यात आला. यासाठी १३ हजार ५०० मेट्रिक टन धान्य या जिल्ह्याला प्राप्त झाले. या प्राप्त धान्यापैकी ६४ टक्के धान्याचे लाभार्थींपर्यंत वाटप झाले आहे.
मुदतवाढ मिळण्याची शक्यता
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत जिल्ह्याला मिळालेले मोफत धान्य वाटपासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. ३१ मेपर्यंत हे धान्य वाटप करावयाचे होते. मात्र धान्य उशिरा प्राप्त झाल्याने व दुकानादारांपर्यंत त्यानंतर ते पोहोचले. सध्या त्याचे वाटप सुरूच आहे. त्यामुळे या धान्य वाटपास मुदतवाढ मिळू शकते, असे सांगितले जात आहे.
धान्य वाटपाची स्थिती
- नियमित धान्य प्राप्त - १५,७२५ मेट्रिक टन
- वाटप- १३,९७४ मेट्रिक टन
- ‘गरीब कल्याण’चे प्राप्त धान्य- १३,५०० मेट्रिक टन
- वाटप - ७१०० मेट्रिक टन
जिल्ह्यातील लाभार्थी
एकूण स्वस्त धान्य दुकान १९५३
एकूण शिधापत्रिकाधारक - १०,००,६१३
अंत्योदय १,३३,४०८
प्राधान्य कुटुंब ४,७६,५२८