जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ९१ विद्यार्थ्यांचे प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:25 PM2018-08-12T12:25:43+5:302018-08-12T12:29:44+5:30
केंद्रीय कोट्यातील १२ विद्यार्थ्यांचा समावेश
जळगाव : येथे सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात केंद्रीय कोट्यातील १५ पैकी १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून आता एकूण ९१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. या विद्यार्थ्यांसह प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुलींच्या वसतिगृहाबाबत झालेल्या करारानुसार ऐनवेळी मक्तेदाराने नकार दिल्याने या वसतिगृहाच्या जागेत बदल करण्यात येऊन हे वसतिगृह शहरातील गिरणा टाकी परिसरात राहणार आहे.
जळगाव येथे जिल्हा रुग्णालयापासून वैद्यकीय महाविद्यालयास सुरुवात झाली असून त्यामध्ये राज्य शासनाच्या कोट्यातील ८५ पैकी ७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यानंतर केंद्रीय कोट्यातील १५ विद्यार्थ्यांपैकी १२ विद्यार्थ्यांनीदेखील प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे एकूण ९१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून केंद्रीय कोट्यातील ३ तर राज्य शासनाच्या कोट्यातील ६ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत.
मुलींच्या वसतिगृहाच्या जागेत बदल
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे स्थानक रस्त्यावर तर विद्यार्थिनींसाठी महामार्गावर मानराज पार्कनजीक वसतिगृह घेण्यात आले. मात्र मुलींच्या वसतिगृहाचा करार ४ लाखात झालेले असताना ऐनवेळी मक्तेदाराने दुप्पट रक्कम सांगत ८ लाखाची मागणी केली. त्यामुळे शासकीय नियमानुसार ते शक्य नसल्याने हा करार रद्द करीत गिरणा टाकी परिसरात दुसरे वसतिगृह घेण्यात आले.