९४ वॉटर हॉर्वेस्टींग, १२ विहिरी व पाच बोअरवेल पुनर्भरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:04 AM2018-09-04T01:04:17+5:302018-09-04T01:04:41+5:30
भुसावळ विभागात १५१ श्री सदस्यांचा सहभाग : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा स्तुत्य सामाजिक उपक्रम
भुसावळ, जि.जळगाव : डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत भुसावळ विभागात ‘पाणी आडवा-पाणी जिरवा’अंतर्गत विहीर पुनर्भरण, कूपनलिका पुनर्भरण व वॉटर हार्वेस्टिंगची सुमारे ८० लाख किमतीची ५१२ कामे लोकसहभागातून करण्यात आली. यात ९४ ठिकाणी वॉटर हार्वेस्टींग, १२ विहिरी आणि पाच कूपनलिकांचे पुनर्भरण ही कामे झाली. यासाठी १५१ श्री सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून परिश्रम घेतले. यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन पाण्याची शुद्धता वाढण्यास मदत होणार आहे.
पुनर्भरण - काळाची गुंतवणूक
वर्षभर पाण्याच्या उपलब्धतेसाठी भूजल पातळी स्थिर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी विहीर/कूपनलिका व वॉटर हार्वेस्टिंग पुनर्भरण काळाची गरज असून भविष्यकाळातील गुंतवणूकच आहे. त्यामुळेच याची गंभीर दखल घेत डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत १५१ श्री सदस्यांनी भुसावळ, यावल शहरासह ग्रामीण भागातील १३ गावांमध्ये विविध पुनर्भरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहे.
भुसावळ शहरात सर्वाधिक कामे
वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचे वाहून जाणाऱ्या पाण्याची साठवण करण्यासाठीची कृत्रिम पद्धत. शहरात ३९४ ठिकाणी श्री सदस्यांनी निस्वार्थपणे प्रतिष्ठानच्यावतीने छतावरील पावसाचे पाणी अडवून वॉटर हार्वेस्टिंगचे कामे पूर्ण केली. तसेच तालुक्यात मोंढाळा, मानमोडी, खंडाळा, फुलगाव व वरणगाव येथे ९ ठिकाणी विहीर पुनर्भरण व बोअरवेल पुनर्भरण करण्यात आले.
यावल तालुक्यातील अट्रावल, नायगाव, वढोदे व इचखेडा येथे पाच ठिकाणी विहिर व बोअरवेल पुनर्भरण करण्यात आले. यासाठी शासकीय निधी खर्च केला असता तर सुमारे ८० लाख रुपये इतका निधी लागला असता. मात्र विविध ५११ पुनर्भरणाच्या कामामुळे सुमारे ८० लाख निधीची शासनाची बचत झाली आहे.
प्रतिष्ठान बनले एक अधिष्ठान
डॉ.नानासाहेब धर्मीधिकारी प्रतिष्ठान अनेक सामाजिक कार्यात निस्वार्थपणे सक्रिय असते. स्वच्छता अभियान, वृक्षलागवड व संवर्धन, राष्ट्रीय एकात्मता तसेच विविध सामाजिक उपक्रम मार्गदर्शनपर शिबीर यासह अनेक उपक्रमांनी प्रतिष्ठानचा शहर व ग्रामीण भागात लौकिक आहे. त्यामुळे सदर प्रतिष्ठान हे जनतेच्या मनातील अधिष्ठान बनले आहे.