चाळीसगावात कुष्ठरोगचे ९८० संशयीत रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 05:16 PM2017-09-23T17:16:02+5:302017-09-23T17:22:21+5:30
कुष्ठरोग शोध मोहिम : ३ लाख १२ हजार २०८ जणांची तपासणी
आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव: आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष कुष्ठरोग तपासणी मोहीमेत चाळीसगाव तालुक्यात एकुण ९८० संशयीत रुग्ण आढळले आहेत. त्यात २४ जणांना नव्याने कुष्ठरोगाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तालुका आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत ही शोध मोहीम राबविली जात आहे. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी प्रबोधन करण्यात येत आहे.
२४ नवीन कुष्ठरोगी रुग्ण
ग्रामीण व शहरी भागात कुष्ठरोग बाधित रुग्णांचा शोध घेण्यात आला. त्यात नागरिकांच्या शरीरावरील चट्टयांची तपासणी करण्यात आली. शोध मोहीमेच्या सुरुवातीलाच संशयीत रुग्णांपैकी प्रत्यक्ष कुष्ठरोग बाधित २४ रुग्ण आढळले. त्यांच्यावर औषधोपचार सुरु केले आहे.
३ लाख १२ हजार नागरिकांची तपासणी
आरोग्य विभागातर्फे ५ ते २० सप्टेंबर दरम्यान ही शोध मोहिम राबवली गेली. ७० हजाराहुन अधिक घरांमध्ये जाऊन तीन लाख १२ हजार २०८ नागरिकांची तपासणी केली. २२ ते २६ सप्टेंबर दरम्यान संशयीत रुग्णांची प्रा.आ.केंद्रावर तपासणी होणार आहे. यात कुष्ठरोग झालेले २४ रुग्ण आढळले. १६ संसर्गजन्य तर आठ असंसर्गजन्य आहेत.
कुष्ठरोगाबाबत अनेक गैरसमज आहे. अजूनही निम्मेपेक्षा अधिक संशयीत रुग्णाची तपासणी झालेली नाही. बाधित कुष्ठरोग रुग्णांची संख्या वाढू शकते. मोहीमेमुळे कुष्ठरोगास आळा बसण्यासाठी मदत होणार आहे.
- डॉ. देवराम लांडे
तालुका वैद्यकीय अधिकारी