जळगावात सराईत गुन्हेगाराकडून चोरीचे ९ मोबाईल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 03:08 PM2018-08-23T15:08:10+5:302018-08-23T15:09:20+5:30
चोरी, जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यात सराईत असलेल्या गुफरान शेख करीम (वय २२, रा. गेंदालाल मील, जळगाव) याला शहर पोलिसांनी अटक केली
जळगाव : चोरी, जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यात सराईत असलेल्या गुफरान शेख करीम (वय २२, रा. गेंदालाल मील, जळगाव) याला शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ४१ हजार रुपये किमतीचे ९ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.
पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुफरान याच्याकडे चोरीचे मोबाईल असून त्याने गेंदालाल मील भागात बिर्याणी हाऊसजवळ एका तरुणाला मारहाण करुन मोबाईल हिसकावून पळ काढला होता, अशी माहिती सहायक फौजदार वासुदेव सोनवणे यांना मिळाली होती. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या पथकातील सहायक निरीक्षक आशिष रोही, वासुदेव सोनवणे, संजय शेलार, बशीर तडवी, गणेश शिरसाळे, संजय भालेराव, दीपक सोनवणे, सुधीर साळवे, अक्रम शेख, प्रणेश ठाकूर, किरण पाटील, अमोल विसपुते व इम्रान सैय्यद यांनी मंगळवारी सायंकाळी गुफरान याला सापळा लावून अटक केली. त्यांना घेतलेल्या घरझडतीत त्याच्याकडे ४१ हजार रुपये किमतीचे ९ मोबाईल आढळून आले. त्याच्यासोबतचे तीन साथीदार फरार आहेत. दरम्यान, गुफरान याच्याकडून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. न्यायालयाने गुफरान याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.