गुटखा प्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह ९ जणांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:13 AM2021-07-16T04:13:40+5:302021-07-16T04:13:40+5:30
जळगाव : चाळीसगाव-मेहुणबारे रस्त्यावर १६ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला ५५ लाख रुपये किमतीच्या गुटखा प्रकरणात तत्कालीन पोलीस ...
जळगाव : चाळीसगाव-मेहुणबारे रस्त्यावर १६ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला ५५ लाख रुपये किमतीच्या गुटखा प्रकरणात तत्कालीन पोलीस निरीक्षक बापू रोहोम, मेहुणबारेचे तत्कालीन सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्यासह ९ जणांची गुरुवारी धुळ्यात अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्याकडे चौकशी झाली. याप्रकरणात चाळीसगासचे आमदार मंगेश चव्हाण यांना सरकारी साक्षीदार करण्यात आले आहे.
चाळीसगाव-मेहुणबारे रस्त्यावर १६ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने ५५ लाख रुपयांचा गुटखा असलेला ट्रक अडवला होता. पथकाने हा ट्रक जळगावला आणला होता. त्यामुळे आ. मंगेश चव्हाण यांनी पथकावर गैरव्यवहाराचा आरोप करून विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती, इतकेच नाही तर पाठलाग करून हा ट्रक जैन कंपनीजवळ अडवला होता. दुसऱ्या दिवशी पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यातच पत्रकार परिषदेत घेतली होती. दरम्यान, याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे व इतरांना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी निलंबित केले होते.
विभागीय चौकशीचे आदेश
तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी या प्रकरणाची विभागीय चौकशीचे आदेश देऊन विभागीय चौकशी अधिकारी म्हणून धुळ्याचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांची नियुक्ती केली होती. बच्छाव यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी असून आतापर्यंत पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून आ. चव्हाण यांनाही सरकारी साक्षीदार करण्यात आलेले आहे. गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम, सहायक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार नारायण पाटील, हवालदार रामचंद्र बोरसे, मनोज अशोक दुसाने, महेश पाटील, चालक प्रवीण हिवराळे, मेहुणबारेचे हवालदार रमेश पाटील व मुख्यालयाचे नटवर जाधव यांची बच्छाव यांनी दिवसभर चौकशी केली. दरम्यान, या सर्वांचे निलंबन मागे घेण्यात आलेले आहे.
कोट...
या प्रकरणाची चौकशी अजून सुरू आहे. गुरुवारी ९ जणांची चौकशी झाली. याआधी पाच जणांची झालेली आहे. साक्षीदार व आरोप असणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले जात आहेत. अजून दोन महिने चौकशी चालेल. चौकशी अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांना सादर केला जाईल.
-प्रशांत बच्छाव, विभागीय चौकशी अधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक, धुळे