वहिणी, पुतण्याला मारहाण करून ९ जणांनी १२ लाखांचे दागिने हिसकावले, तिन्ही काकांना अटक

By सागर दुबे | Published: April 26, 2023 06:12 PM2023-04-26T18:12:20+5:302023-04-26T18:12:42+5:30

आरोपींना २९ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

9 persons beat up sister-in-law, nephew and grabbed jewelery worth 12 lakhs, all three uncles arrested | वहिणी, पुतण्याला मारहाण करून ९ जणांनी १२ लाखांचे दागिने हिसकावले, तिन्ही काकांना अटक

वहिणी, पुतण्याला मारहाण करून ९ जणांनी १२ लाखांचे दागिने हिसकावले, तिन्ही काकांना अटक

googlenewsNext

जळगाव : शहरातील दीक्षितवाडी येथील पियूष नरेंद्र पाटील यांच्यासह त्यांच्या आईला गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात स्वतःच्या काकांसह ९ जणांनी मारहाण करीत १२ लाख ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हिसकविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिन्ही काकांना अटक केली आहे. त्यांना २९ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दीक्षितवाडी भागात माजी नगरसेवक स्व.नरेंद्र भास्करराव पाटील यांचे घर आहे. घरातील पहिल्या माळ्यावर त्यांचा मुलगा पियूष नरेंद्र पाटील हा आई ज्योती यांच्यासह राहतो. तर घराच्या तळ मजल्यावर काका विजय भास्कर पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील हे राहतात. नरेंद्र पाटील यांचे दि.२९ जुलै २०१८ रोजी निधन झाले. नरेंद्र पाटील यांचे द जळगाव पीपल्स बँक, दाणा बाजार शाखेत वैयक्तिक लॉकर होते. 

नरेंद्र पाटील यांचे निधन झाल्यानंतर बरेच वर्ष लॉकर न वापरण्यात आल्याने त्याबाबत बँकेने नोटीस प्रसिद्ध केली होती. नोटीस वाचल्यानंतर पियूष पाटील यांनी आई ज्योती, बहीण मयुरी आणि स्वतःच्या नावाची कायदेशीर वारस म्हणून नोंद केली. त्यानंतर त्यांना लॉकर उघडण्याची परवानगी मिळाली. दरम्यान, बँकेत लॉकर उघडताना दोन वारसांची संमती आवश्यक असल्याचे संजय भास्कर पाटील यांनी पियूष यास कळविले होते.  नंतर ११ ऑक्टोबर २०२२ रोजी संजय पाटील यांनी पियूषला सांगितले की, लॉकर उघडण्याची परवानगी मिळालेली आहे. आपण बँकेत जाऊन दागिने घेऊन येऊ तू कागदपत्रे घेऊन ये. दोघे दुचाकीने बँकेत गेले असता लॉकर मधील दागिने काढून घे आपण याच बँकेत तुझ्या आईच्या नावाने लोकांमध्ये ठेवून देऊ. नंतर ही शाखा लांब होईल आपण दागिने घरामागील गणेशवाडी शाखेत ठेऊन देऊ असे त्यांनी सांगितले. काकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पियूष याने सर्व दागिने काढून प्रक्रिया पूर्ण केली आणि चावी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे परत दिली. लॉकरमध्ये असलेले १२ लाख ४० हजारांचे दागिने आणि आजोबा शंकर जगत पाटील यांचे मृत्युपत्र व स्टॅम्प असे बॅगेत ठेवून दोघे दुचाकीने घरी आले.

बँग घेऊन उठताच केली धक्काबुक्की
आपण घरी चहा घेऊ असे संजय पाटील यांनी सांगितले. त्यावेळी घरात काका विजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, सुहास वसंत चौधरी, यश सुहास चौधरी, सारंग सुहास चौधरी, नरेंद्र गुलाबराव गांगुर्डे, रागिणी सुहास चौधरी, शैलेजा नरेंद्र गांगुर्डे असे घरात हजर होते. चहा घेतल्यावर पियूष पाटील बॅग घेऊन उठला आणि मी दागिने बँकेत ठेवून येतो असे त्यांना सांगून निघत असताना काका विजय भास्कर पाटील याने बॅग जबरदस्तीने हिसकावली. दागिने तुझ्या आईच्या नावाने लॉकरमध्ये ठेवायला तुमची काय ठेव आहे का? असे म्हणून धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. तसेच तुझ्या आईला बोलावून घे तिला पण सांगतो असे बोलून शिवीगाळ केली. पियूष याने आईला बोलवून घेतल्यानंतर इतरांनी घराचे मेन गेट बंद करीत काका व इतरांनी पियूष यास खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या आईला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. पोलिसात तक्रार केली तर यांना अजून मारा आणि त्यांचा माज उतरवा असे बोलून दोघांना घराबाहेर काढले.

अखेर पोलिस ठाणे गाठले...
घडलेल्या प्रकारामुळे ते भयभीत झाले असल्याने पियूष पाटील यांनी आजवर पोलिसात तक्रार दाखल केलेली नव्हती. दरम्यानच्या काळात त्यांनी दागिने परत करण्यासाठी त्यांनी वारंवार विनंती केली मात्र त्यांनी धमकी देत हाकलून दिले होते. अखेर बुधवारी सकाळी याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पियूष नरेंद्र पाटील यांच्या फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून विजय पाटील, संजय पाटील, मनोज पाटील या तिन्ही काकांना अटक करण्यात आली असून त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, २९ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. रंजना पाटील यांनी कामकाज पाहिले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे करीत आहेत.

Web Title: 9 persons beat up sister-in-law, nephew and grabbed jewelery worth 12 lakhs, all three uncles arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.