९ हजारावर लाभार्र्थींचे अंगठे जुळेना ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 08:05 PM2019-06-27T20:05:18+5:302019-06-27T20:05:41+5:30
जामनेरची स्थिती : नावेही गायब, शेंदुर्णीच्या अनेक महिला व पुरुषांची तहसील कार्यालयावर ‘धडक’
जामनेर : अंत्योदय व प्राधान्य योजनेतील सुमारे ९ हजार लाभार्थ्यांचे अंगठे जुळत नसल्याने ही कुटुंबे शिधा पत्रिकेद्वारे मिळणाऱ्या धान्यापासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेंदुर्णी येथील सुमारे १०० महिला व पुरुषांनी गुरुवारी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागावर धडक दिली. त्यांनी केलेल्या तक्रारीतून ही बाब समोर आली. याच बरोबर काही काही लाभार्थ्यांची नावे संगणकीय प्रणालीतून गायब झाल्याने लाभार्थी त्रस्त आहेत.
अंत्योदय व प्राधान्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची संख्या तालुक्यात सुमारे ४८ हजार असून त्यातील सुमारे ९ हजार लाभार्थ्यांचे अंगठे जुळत नसल्याने त्याना धान्य पुरवठा केला जात नाही. नेरी, शेंदुर्णी, लोंढरी, गोद्री, फत्तेपूर, जामनेर, पहूर, कुंभारी बुद्रुक, तोंडापूर आदी गावातील लाभार्थ्यांची याबाबत तक्रार आहे. शेंदुर्णी येथील त्रस्त लाभार्थ्यांनी तहसीलदार नामदेव टिळेकर व पुरवठा अधिकारी यांची भेट घेतली व नियमित धान्य पुरवठा करण्याची मागणी केली.
दरम्यान, नवीन शिधा पत्रिका बनवून देण्यासाठी १ हजार घेतले व शिधा पत्रिका देखील मिळाली. मात्र धान्य दुकानदार धान्य देत नसल्याची तक्रार शेंदूणीर्तील एका महिलेने केली. यावेळी पैसे घेणारा तो युवक हजर होता, महिलेच्या तक्रारीनंतर त्याने पोबारा केला.
‘आॅनलाईन’ चा फज्जा, लाभार्थी त्रस्त
तालुक्यातील शिधा पत्रिकाधारकांचे आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया गेल्या दीड वर्षांपासून सुरु आहे. ज्यांनी आधार लिंक केले त्यांची देखील नावे संगणकीय प्रणालीतून गायब झाल्याचे दिसत आहे. पुरवठा विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
..........
ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड लिंक झालेले आहे, मात्र अंगठे जुळत नाही त्यांना नॉमिनी लावून ध्यान्य पुरवठा केला जाईल. ज्यांची नावेच संगणकीय प्रणालीत दिसत नाही त्यांना आधार कार्ड लिंक झाल्यानंतर पुरवठा केला जाईल. आॅनलाईन प्रणालीचे काम प्रगतीपथावर आहे.
- नामदेव टिळेकर, तहसीलदार, जामनेर.