जिल्ह्यातील शेती नुकसानीचे ८९ टक्के पंचनामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 12:13 PM2019-11-08T12:13:38+5:302019-11-08T12:13:51+5:30
अतिवृष्टीचा फटका : अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदील
जळगाव : जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे १४६८ गावांमधील ६ लाख १ हजार ३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्यापैकी गुरूवार ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळपर्यंत तब्बल ५ लाख ३८ हजार १२३ हेक्टरवरील म्हणजेच ८९ टक्के नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस या पिकांना मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसला़ त्यामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडून हवालदील झाला असून शेतीला लागलेला खर्चही निघालेला नाही़
दरम्यान, सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याच्या सूचना केल्यानंतर प्रशासनाने हालचाली करीत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतींचे पंचनामे करण्यास सुरूवात केली़
पंचनामे आज पूर्ण होण्याची शक्यता
६ लाख १ हजार ३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्यापैकी गुरूवार ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळपर्यंत ४ लाख ८३ हजार १२९ शेतकऱ्यांच्या तब्बल ५ लाख ३८ हजार १२३ हेक्टरवरील म्हणजेच ८९ टक्के नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले. गुरूवारी एकाच दिवसात १ लाख ९ हजार २२९ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळपर्यंत पंचनामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जामनेर व चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान
जामनेर तालुक्यात सर्वाधिक ८५ हजार १६६ तर चाळीसगाव तालुक्यात ७७ हजार ८२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बोदवड तालुक्यात सर्वात कमी १८ हजार ३७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.