९० कोरोना बाधित रुग्ण घेताहेत जिल्ह्याबाहेर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:51 AM2020-06-22T11:51:21+5:302020-06-22T11:51:34+5:30
रुग्ण संख्या वाढली : पोर्टलवर माहिती आली समोर
जळगाव : जिल्हाभरात ९० रुग्ण हे बाहेर जिल्ह्यात उपचार घेत असल्याची माहिती रविवारी समोर आली आहे़ शासनाच्या पोर्टलवर नेहमी येणाऱ्या रुग्णसंख्येत ही माहिती देण्यात आली आहे़ त्यानुसार जिल्ह्याची आकडेवारी वाढून २४०२ वर पोहचली आहे़
काही जणांनी बाहेर जिल्ह्यात जावून त्या ठिकाणी तपासण्या केल्या व त्या ठिकाणीच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ प्रयोगशाळेत तपासणी झाल्यानंतर पोर्टलवर त्यांच्या मूळ रहिवासाचा उल्लेख करण्यात येतो. दरम्यान, हा आकडा शंभरापेक्षा अधिक दाखवण्यात येत होता़
शहरात कोरोना @ ४४४
जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या जळगाव शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अतिशय झपाट्याने वाढतच आहे़ रविवारी एकाच दिवसात ४० नवे रुग्ण आढळल्याची नोंद करण्यात आली आहे, मात्र, यातील १३ रुग्णांचा तपासणी अहवाल हा शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेला होता़ रुग्णसंख्या ४४४ गेलेली आहे़ दरम्यान, रविवारी २० रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले़ शहरात गेल्या काही दिवसांपासून दुहेरी संख्येने रुग्ण आढळून येत आहेत़ यात अनेक नवीन भागात दररोज रुग्ण सापडत असल्याने शहराच्या सर्वच बाजूने कोरोनाने विळखा दिल्याचे चित्र आहे़ शहरातील १४४ रुग्णांवर सद्यस्थितीत उपचार सुरू आहेत़
या ठिकाणी आढळले रुग्ण
शनिवारी रात्री आलेल्या अहवालांमध्ये मास्टर कॉलनी ५, मेहरूण २, महाजन वाडा १, मोहन नगर २, कोल्हे नगर २, माळी वाडा १ तर रविवारी आलेल्या अहवालांमध्ये पिंप्राळा ३, शिवाजीनगर २, शाहूनगर १, कोल्हे नगर १, रायसोनी कॉलनी १, रामेश्वर नगर १, एमआयडीसी १, गणपती नगर, मेहरूण प्रत्येकी १ व अन्य ५ यासह दहा रुग्णांच्या रहिवासांची माहिती समोर आलेली नव्हती़