चोरवड सीमा तपासणी नाक्यावर २९ लाखांची रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 06:33 PM2019-10-09T18:33:10+5:302019-10-09T18:35:40+5:30
चोरवड सीमा तपासणी नाक्यावर २९ लाखांची रोकड जप्त करण्यात आली.
किरण चौधरी
रावेर, जि.जळगाव : रावेरविधानसभा मतदारसंघातील आचारसंहिता कक्षांतर्गत चोरवड सीमा तपासणी नाक्यावर स्थापन केलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाने मध्य प्रदेश परिवहन महामंडळाच्या बºहाणपूर-रावेर बसमधून खंडवा येथील सळई व्यापारी अशरफभाई सरईवाले यांचा नोकर मोहंम्मद शहजादे मोहंम्मद इलियास रा.खंडवा यास पिशवीत ५०० , २००, १०० व ५० रूपये चलनी नोटांची २९ लाख १५ हजार २०० रू ची रोकड घेऊन जाताना झाडा झडतीत पकडले. ही घटना ९ आॅक्टोबर रोजी दुपारी २.२० वाजेच्या सुमारास घडली.
रावेर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहिता कक्षांतर्गत चोरवड मध्य प्रदेश सीमा तपासणी नाक्यावर स्थापन करण्यात आलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाचे प्रमुख नवाज रमजान तडवी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक एस.आर.गायकवाड व पोलीस कॉन्स्टेबल विनोद भोळे यांनी मध्य प्रदेशातून आलेल्या मध्य प्रदेश राज्य परिवहन महामंडळाच्या कंत्राटातील बºहाणपूर-रावेर बस (क्रमांक एमपी-०९-एफए-३७७५) ची झाडाझडती घेतली. त्यात मोहंम्मद शहजाद मोहंम्मद इलियास (रा.५६११, अवस्थी मार्ग, खंडवा) याच्या पिशवीतून २९ लाख १५ हजार २०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही घटना ९ आॅक्टोबर रोजी दुपारी २.२० वाजेच्या सुमारास घडली.
संशयितास रावेर निवडणूक निर्णय अधिकारी तथा फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या कक्षात आणून त्याची चौकशी करण्यात आली. सहाय्यक खर्च निरीक्षक आमीन शार्दुल यांनी ५००, २००, १०० व ५० रूपये चलनी नोटांमधील २९ लाख १५ हजार २०० रू ची रोकड मोजून, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहिता कक्षांतर्गत रोख मुक्तता समितीमार्फत कोषागारात सील करून वर्ग करण्यात आली.
संबंधित संशयित मोहंम्मद शहजाद मोहंम्मद इलियास (रा. ५६११, अवस्थी मार्ग, खंडवा) याने त्याचा खंडवा येथील मालक तथा सळई व्यापारी अशरफभाई सरईवाले यांच्या मुलाच्या लग्नासाठी व त्याचा व्यवसाय थाटण्यासाठी त्याचे भुसावळ येथील आजी आजोबांकडे ही रक्कम पोहच करण्यासाठी जात होतो, असा प्रथमदर्शनी खुलासा केला आहे.
दरम्यान, संबंधित रोकड असलेल्या मालकाचा निवडणूक कामाखेरीज वैयक्तिक वा खाजगी रोकड नेण्याचा शुद्ध हेतू व स्वामीत्व सिध्द करेपावेतो, ती रोकड निवडणूक आयोगाच्या रोख मुक्तता समितीकडे सिलबंद करून जप्त करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.थोरबोले यांनी दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिलाषा देवगुणे, आचारसंहिता कक्ष प्रमुख संजय तायडे, सहाय्यक कक्ष प्रमुख अतुल कापडे व पटवारी आदी उपस्थित होते.
या कारवाईमुळे रावेर विधानसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे. रोकड नेणारा खरोखर खाजगी व्यापाºयाचा माणूस आहे का? आणि मालकाच्या मुलाचे लग्न तीन महिन्यांनी असताना व त्याचा व्यवसाय थाटण्याचे कारण पुढे करण्यात येत असले तरी आताच निवडणुकीच्या आचारसंहितेत नोकराच्या हाती ती रोकड पाठवण्यात येत असल्याचे कारणाचा ताळमेळ जमत नसल्याने संशयाचे वलय निर्माण झाले आहे. तो कोणत्या उमेदवाराला निवडणूक कामी तर कुणाला अर्थ साहाय्य करीत नाही ना? अशा शंका उपस्थित केल्या जात असल्याने एकच खळबळ उडाली आहे.