बाजार समितीसाठी एकाच दिवशी ९० उमेदवारी अर्ज दाखल
By Ajay.patil | Published: March 31, 2023 06:04 PM2023-03-31T18:04:30+5:302023-03-31T18:04:58+5:30
आतापर्यंत १०२ अर्ज दाखल, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता एकच दिवस शिल्लक
अजय पाटील, जळगाव: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३ एप्रिलपर्यंत मुदत आहे. मात्र, शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच दिवस मिळणार असल्याने, शुक्रवारी जळगाव बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची तुफान गर्दी केली. एकाच दिवशी १८ जागांसाठी ९० अर्ज दाखल झाले. आतापर्यंत १०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
आता शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एकच दिवस शिल्लक असून, अंतीम दिवशी देखील अनेक उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची चांगलीच गर्दी झाली होती. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेस, शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांसोबतच अनेक अपक्ष उमेदवारांनी देखील आपले उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केले आहेत. शेतकरी देखील उमेदवारी करु शकणार असल्याने सोमवारी उमेदवारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
मतदारसंघानिहाय आतापर्यंत दाखल झालेले अर्ज
- मतदार संघ - आलेले उमेदवारी अर्ज
- विकास सोसायटी मतदारसंघ - ८१
- ग्रामपंचायत मतदारसंघ - १०
- व्यापारी मतदारसंघ - ९
- हमाल-मापाडी मतदारसंघ - २