जळगावात ९० हजार रुपये किंमतीचा लाटण्यांचा साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 03:17 PM2023-05-19T15:17:15+5:302023-05-19T15:18:24+5:30
अडावद येथे सागवान व अंजनच्या तयार बेलनचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली.
अडावद, जि. जळगाव : एका घरातून सागवान लाटण्यांचा ९० हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. यात सागवानची १ हजार ५१०, तर अंजनचे २५० नग तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. वन विभागाने गुरुवारी सायंकाळी अडावद ता. चोपडा येथे ही कारवाई केली.
अडावद येथे सागवान व अंजनच्या तयार बेलनचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. याआधारे वनविभागाने अडावद येथील तकिया मोहल्ल्यातील नाविद खान मोहम्मद रफीक (३८) याच्या घरावर छापा घातला. यावेळी वनाधिकाऱ्यांना सागवानच्या तयार लाटण्यांचे १ हजार ५१०, अंजनचे २५० नग लाटणे असे ५१ हजार ५५० रुपये किमतीचे बेलन, तर ४० हजार रुपये किमतीची लाटणे बनविणारी २ इलेक्ट्रिक मशिन असा सुमारे ९१ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
यावल वनविभागाचे उपवन संरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली चोपड्याचे सहायक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, अडावद वनक्षेत्रपाल आनंदा पाटील, अडावद वनपाल कैलास महाजन, वनपाल नागणे, आर. एम. जाधव, वनरक्षक हनुमंत सोनवणे, गजानन आढवणे, निखिल सपकाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.