९० वर्षीय पहिलवानाने आत्मविश्वासाच्या बळावर दिली ‘कोरोना’ला पटकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:34 PM2020-06-04T17:34:26+5:302020-06-04T17:36:17+5:30
भुसावळ येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी असलेल्या मातीतल्या पहिलवानाने ९० व्या वर्षी ‘कोरोना’वर यशस्वी मात केली.
वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : कोरोना म्हटले की प्रत्येकाच्या छातीत धडकी भरते. समज- गैरसमज यामुळे आत्मविश्वास कमी होतो. नैराश्य येते. मात्र भुसावळ येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी असलेल्या मातीतल्या पहिलवानाने ९० व्या वर्षी ‘कोरोना’वर यशस्वी मात केली. विशेष म्हणजे दमासारख्या व्याधी असतानाही त्यांनी कोरोनाला धूळ चारली.
चोखाजी उमाजी आव्हाड असे या सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते ३० वर्षांपूर्वी रेल्वेत सेवेत असताना लोको पायलट म्हणून त्यांनी त्याकाळी सर्व मेल एक्सप्रेस गाड्यांवर सेवा बजावली. मातीतला माणूस पहिलवानी हा त्यांचा पेशा. चाळीसगाव या मूळ गावी त्यांनी पहिलवानी केली. तोपर्यंत त्यांनी एकालाही अंगाला हात लावू न देता चित केले, याचा अनुभव कोरोनालाही आला.
२१ 'मे' ला ९० वर्षीय पहिलवान आजोबा आव्हाड यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. घरातली सर्व मंडळी सुन्न झाली. मात्र पहिलवान व सध्या मेडिटेशन करणारे आजोबा यांनी आत्मविश्वास जराही डगमगू दिला नाही. त्यातला त्यात त्यांना श्वास घ्यायला त्रास होणारी 'दमा' व्याधी होती. त्यांनी अहवाल ऐकल्यावर मन विचलित होऊ दिले नाही. घरच्यांना धीर दिला. घाबरू नका. मला काहीही होणार नाही. त्यांचा हे आत्मविश्वास बघून घरच्यांनाही धीर आला. ते स्वत:हून भुसावळ रेल्वे कोविड रुग्णालयात उपचारासाठी गेले. दररोज एक तास मेडिटेशन हा सध्या त्यांचा आरोग्यमंत्र यावर त्यांनी कोरोनाशी लढाई यशस्वी जिंकली. तसेच या दरम्यान कोविड रुग्णालयात त्यांना डॉक्टर, नर्स, पूर्ण अधिकारी वर्ग यांनी पाठिंबा दिला. त्यांची वेळोवेळी काळजी घेतली. जे अनुभव कोरोना रुग्णांना इतर रुग्णालयात येतात येथे मात्र त्यांना त्या तुलनेत आव्हाड यांची रेल्वे विभागाने वेळोवेळी घड्याळाचे काटे सरकतात त्यानुसार काळजी घेतली. त्यांनी लवकर कोरोनावर मात करण्याचे श्रेय रेल्वेचे डॉक्टर, नर्स, अधिकाऱ्यांनाही दिले आहे.
आज ते कोरोनामुक्त होऊन घरी सुखरूप परतले आहे. वय कितीही असो मात्र आत्मविश्वास असला की कशावरही मात करता येऊ शकते हे ९० वर्षीय पहिलवानाने कोरोनाला धूळ चारून सिद्ध केले. संपूर्ण देशात कदाचित ९० व्या वर्षी कोरोनाला मात देणारे आव्हाड हे एकमेव असू शकतील.