देशात ९८ लाख पुरुष, २ कोटी महिलांना स्थूलपणा - गिरीश महाजन
By सुनील पाटील | Published: March 4, 2023 09:07 PM2023-03-04T21:07:57+5:302023-03-04T21:09:01+5:30
वैद्यकिय शिक्षण व द्रव्ये विभागातर्फे शनिवारपासून स्थूलपणा जनजागृती अभियानाला राज्यात सुरुवात झाली.
जळगाव : स्थूलपणा अनेक आजारांचे मुळ आहे. देशात ९८ लाख पुरुष तर दोन कोटी महिलांना स्थूलपणाचा आजार आहे. हा आजार टाळण्यासाठी खाण्यापिण्याचे पथ्य पाळण्यासह नियमित व्यायाम आवश्यक असून मुलांची लहानपणापासूनच काळजी घ्यावी असे आवाहन वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
वैद्यकिय शिक्षण व द्रव्ये विभागातर्फे शनिवारपासून स्थूलपणा जनजागृती अभियानाला राज्यात सुरुवात झाली. जळगावातील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातून मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर वैद्यकिय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.अजय चंदनवाले, अधीष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील आदी उपस्थित होते.
वैद्यकिय शिक्षण व द्रव्ये विभागातर्फे राज्यभर वेगवेगळे अभियान राबविले जात आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून ६.५ लाख शस्त्रक्रिया सुरू असल्याचे महाजन यांनी सांगितले. वैद्यकिय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.अजय चंदनवाले यांनी लहान मुले लठ्ठ होण्यामागे वारंवार खाणे, जास्त खाणे, गोड पदार्थ खाणे, जंक फूड खाणे, जेवणात कर्बोदक, व्यायामाचा अभाव आदी कारणे सांगितली.
एकदा जेवतो तो योगी, दोनदा जेवतो तो भोगी व तिनदा जेवतो तो रोगी अशी संतांची शिकवण सांगतानच डॉ.चंदनवाले यांनी खाण्याची वारंवारता कमी करणे हा लठ्ठपणा टाळण्याचा आणि निरोगी जगण्याचा प्रभावी मार्ग असल्याचे स्पष्ट केले. एका महिन्यात दहा हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आल्याचे प्रशासनाने यावेळी सांगितले. डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रोज
महाजनांनी सांगितला फिटनेस फंडा
गिरीश महाजन यांनी आपण कसे फिट आहोत याचा फंडा सांगतानाच त्यांनी काही टिप्स दिल्या. आपण कधीच चहाला स्पर्श केलेला नाही. मांसाहारी, तळलेले, चमचमीत पदार्थ कधीच खाल्ले नाहीत. नियमित दोन वेळा जेवण, १४ किलोमीटर धावणे व एक तास व्यायाम हे आपल्या फिटनेसचे महत्वाचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले