जात वैधता प्रमाणपत्रासाठी दोन दिवसांत ९८० अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:12 AM2020-12-27T04:12:26+5:302020-12-27T04:12:26+5:30
जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अथवा प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती द्यावी लागणार ...
जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अथवा प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती द्यावी लागणार असल्याने यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात लगबग वाढली आहे. कार्यालय सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आल्याने नाताळ व चौथा शनिवार असे दोन दिवसांत ९८० अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत जवळपास दोन हजार ५०० अर्ज दाखल झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, यामध्ये उमेदवारी अर्जांसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अथवा प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती जोडणे बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात मोठ्या प्रमाणात निवडणुकीस उभे राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज दाखल होत आहे. यात ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अनेक इच्छुक सरसावले आहेत. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र अथवा प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती मिळविण्यासाठीदेखील अर्ज दाखल केले जात आहे. त्यामुळे शनिवार, दि. २६ डिसेंबरपर्यंत जवळपास दोन हजार ५०० अर्ज दाखल झाले आहेत.
सुटीच्या दिवशी वाढली संख्या
निवडणूक प्रक्रियेदरम्यान २५ रोजी नाताळ, २६ रोजी चौथा शनिवार व २८ रोजी रविवारची सुटी आली आहे. त्यात अर्ज दाखल करण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंतच असल्याने लगबग वाढताना दिसत आहे. २५ ते २७ डिसेंबर या काळात सुट्या आल्याने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये, याकरिता या शासकीय सुटीच्या दिवशी सकाळी ९.४५ ते ६.१५ या कार्यालयीन वेळेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जात आहे. या दोन दिवसांत ९८० अर्ज दाखल झाले आहेत. एकूणच निवडणूक प्र क्रिया सुरू झालेल्या दिवसापासूनची व आता या दोन दिवसांच्या सुटीच्या दिवसांची तुलना पाहता सुटीच्या दिवशी अर्जांची संख्या वाढली आहे.