वाद होऊन २० वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 16:16 IST2025-02-20T16:16:03+5:302025-02-20T16:16:30+5:30
पाचोरा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

वाद होऊन २० वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून
Jalgaon Murder: पाचोरा पूर्ववैमनस्यातून वाद होऊन २० वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही थरारक घटना पाचोरा येथील बाहेरपुरा भागात मंगळवारी रात्री १२:३० वाजता घडली. यात संशयिताला अटक झाली आहे.
हेमंत संजय सोनवणे (२०, रा. महात्मा फुलेनगर, पाचोरा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी रात्री तो मित्रांसोबत घरी जात असताना बाहेरपुरा भागातील व्ही. पी. रोडवर रोहित गजानन लोणारी (२३, रा. शिवकॉलनी, पाचोरा) याने हेमंत याच्याशी वादघातला. रोहितने कमरेला असलेला चाकू काढून हेमंत याच्या पोटात खुपसला. मारेकरी तिथून पसार झाला. पोलिसांनी हेमंतला खासगी दवाखान्यात दाखल केले. नंतर त्याला लागलीच जळगाव येथे हलविण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
बुधवारी दुपारी हेमंत सोनवणे याच्या खुनातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी हेमंतच्या आईसह जमाव पाचोरा पोलिस स्टेशनला आला. रोहित यास चाकू पुरविणारा कोण? त्यासही सहआरोपी करून अटक करण्याची मागणी हेमंतच्या नातेवाइकांनी केली. जळगाव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करून हेमंतच्या मृतदेहावर पाचोरा येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार करीत आहेत.