भीषण! जळगावात वाळूच्या डंपरने ९ वर्षाच्या चिमुरड्याला चिरडले: नागरिकांनी डंपर पेटवला; वाहतूक चार तास ठप्प
By विजय.सैतवाल | Updated: December 25, 2024 22:09 IST2024-12-25T22:09:00+5:302024-12-25T22:09:20+5:30
बहीण व मामा गंभीर जखमी : संतापलेल्या नागरिकांनी डंपर पेटवला; ठिय्या आंदोलन करीत महामार्ग केला बंद; वाहतूक चार तास ठप्प

भीषण! जळगावात वाळूच्या डंपरने ९ वर्षाच्या चिमुरड्याला चिरडले: नागरिकांनी डंपर पेटवला; वाहतूक चार तास ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : शहरातील कालिंका माता चौफुलीजवळ भुसावळकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूच्या डंपरने दुचाकीला उडवल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता घडली. या घटनेत ९ वर्षाच्या चिमुरड्याच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर दुचाकीवरील चिमुरड्याचा मामा व मोठी बहीण गंभीर जखमी झाले आहेत. योजस धीरज बऱ्हाटे (वय ९, रा. लीला पार्क, अयोध्या नगर) असे मयत बालकाचे नाव आहे.
योजस आपल्या मामा सोबत जेवणाचे पार्सल घ्यायला घरून निघाला. यावेळी मामा योगेश हरी बेंडाळे व बहीण भक्ती धीरज बऱ्हाटे देखील सोबत होते. दुचाकीने कालिंका माता चौकातून जात असताना भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीला धडक दिली. त्यात योजस हा डंपरखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मामा योगेश व बहीण भक्ती जबर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संतापलेल्या नागरिकांनी डंपर पेटवले
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. वाळूचे डंपर असल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी डंपर पेटवून दिले. महामार्गावर आंदोलन करून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतापलेल्या नागरिकांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तब्बल तासभर नागरिकांना पोलिसांना घटनास्थळावरून हटवता आले नाही.