अ. भा. मराठी साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी गिरीश महाजन
By संजय पाटील | Published: October 29, 2023 01:13 PM2023-10-29T13:13:46+5:302023-10-29T13:14:27+5:30
या निवडीबाबतची माहिती साहित्य मंडळाचे समन्वयक डॉ. नरेंद्र पाठक याना कळवण्यात आली आहे.
अमळनेर (जि.जळगाव) : फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पदाधिकारीशी चर्चा केल्यानंतर मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी व कार्यकारी मंडळाने रविवारी ही निवड जाहीर केली. त्याचप्रमाणे संमेलनाचे निमंत्रक म्हणून मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची तर प्रमुख संरक्षक व सल्लागार म्हणून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबाबतची माहिती साहित्य मंडळाचे समन्वयक डॉ. नरेंद्र पाठक याना कळवण्यात आली आहे. संमेलनाच्या इतर पदाधिकारी आणि विविध समित्यांची निवड आठवडाभरात करण्यात येणार आहे. त्यांच्यावर जबाबदारी देखील सोपवण्यात येणार असल्याची माहिती म. वा. मंडळाने दिली.
साहित्य संमेलनाच्या प्रमुख पदांवर जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांची निवड झाल्याने संमेलन यशस्वी करण्यासाठी गती मिळणार आहे. नुकतीच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रताप महाविद्यालयात आढावा बैठक घेऊन समित्या, सुख सुविधा, सुशोभीकरण, लागणाऱ्या गरजा आदींबाबत चर्चा केली होती. त्यानुसार संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे.