मंजूर दोन लाखापैकी एक लाखाची मागितली लाच, ग्रामसेवक व ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 11:44 PM2024-02-17T23:44:14+5:302024-02-17T23:44:59+5:30
या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव : १५व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार शिलाई मशिन प्रशिक्षण केंद्रासाठी मंजूर झालेल्या दोन लाख रुपयांच्या निधीपैकी एक लाख रुपयांची लाच मागणारा ग्रामसेवक आणि डीडीपी ऑपरेटर जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी (रा.साकळी, ता.यावल) याने सांगितल्याने एक लाखाची लाच स्वीकारताना ऑपरेटर सुधाकर धुडकू कोळी (३५, रा. चुंचाळे) याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाईत शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी यावल तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायतमध्ये करण्यात आली. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील चुंचाळे येथील रहिवासी असलेल्या तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे एक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून १५व्या वित्त आयोगाच्या शिफारशीमधून गावात शिलाई मशिन प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागातील महिला व युवतींना स्वावलंबी करण्याच्या योजनेसाठी केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता. या मंजूर निधीच्या ५० टक्के रक्कम अर्थात एक लाख रुपये लाचेची मागणी चुंचाळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हेमंत जोशी याने केली. या विषयी तक्रारदाराने शुक्रवार, १६ फेब्रुवारी रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास ग्रामसेवक जोशी याने सांगण्यावरून ऑपरेटर सुधाकर कोळी हा एक लाख रुपये स्वीकारत असताना सापळा रचून असलेल्या पथकाने रंगेहात पकडले.
याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, एन.एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोलिस नाईक बाळू मराठे, सुनील वानखेडे, पोहेकॉ रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.