महिलेच्या पतीला पाठविले कथित प्रेम प्रकरणाचे पत्र, लग्नाआधी आणि लग्नानंतरही त्रास
By सुनील पाटील | Published: October 13, 2022 07:10 PM2022-10-13T19:10:14+5:302022-10-13T19:10:39+5:30
महिलेच्या पतीला प्रेम प्रकरणाचे पत्र पाठवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव : कथित प्रियकराने एका महिलेच्या पतीसह त्यांच्या नातेवाईकांना कथित प्रेमप्रकरणाबाबत पत्र पाठवून संसार मोडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार शहरात घडला आहे. या महिलेच्या फिर्यादीवरुन गुरुवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणामुळे महिलेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.
शहरात वास्तव्याला असलेल्या २८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून त्यानुसार, एका व्यक्तीने महिलेला वारंवार प्रेमप्रकरणाबाबत पत्र पाठविले आहे. लग्न जुडल्यानंतर तिच्या होणाऱ्या पतीला पत्र पाठवून आमचे प्रेमसंबंध आहेत, असे नमून करुन त्यात अश्लिल शब्दांचा वापर करण्यात आलेला आहे. २१ एप्रिल २०१८ ते ७ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत संबंधिताने हे पत्र पाठविले आहे. लग्न झाल्यानंतर देखील तिच्या पतीला व नातेवाईकांना पुन्हा पुन्हा पत्र पाठवून प्रेमसंबंध व अश्लिल शब्दांचाच वापर केला आहे. तिचे लग्न जुळू नये. जुळलेच आहे तर ते टिकू नये. संसार तुटावा यासाठीच या कथित प्रेमप्रकरणाबाबत संबंधित व्यक्ती पत्र पाठवित असल्याचे महिलेचे म्हणणे आहे. शिवीगाळ करण्यासह ठार मारण्याचीही धमकी त्याने दिली आहे. याप्रकरणात विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला अमलदार भारती देशमुख करीत आहेत.