दृष्टी संकटाने अंधारले तान्हुल्या ‘प्रणय’ला...‘लता’वेलीने फुलविले ‘भोई’ राजाच्या आयुष्याला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2023 04:26 PM2023-04-26T16:26:23+5:302023-04-26T16:32:54+5:30
दीड महिन्यांच्या लेकराच्या डोळ्यात नियतीने पेरला अंधार...संकटापुढे दातृत्वाचा प्रकाशही ठरला आबदार नि रुबाबदार...
जळगाव : तशी प्रसृती होतीच मुदतपूर्व. तशातच तान्हुल्याचे रडबोल गुंजले. काहीसा आनंद दरवळला. तेच नियतीच्या डोळ्यांना खुपलं. त्याच्या नशिबी ‘श्वास’कोंडी आली. म्हणून कृत्रिम ऑक्सिजन पुरवावा लागला. त्याचीही बाधा झाली. ‘प्रणय’ झटके देत गेला. तशातच डोळ्यांना बाधा झाली आणि ‘प्रणय’च्या नवआयुष्यालाच अंधारपणाची किनार जुळण्याची भिती निर्माण झाली. तेव्हा शस्त्रक्रियेचा पर्याय उरला. तेव्हा ‘प्रणय’चे माय-बापही व्यथित झाले. तेव्हा तरारला दातृत्वाचा वेल...या वेलीने शस्त्रक्रियेचा आर्थिक भार पेलला आणि तान्हुल्या ‘प्रणय’च्या डोळ्यात प्रकाश पेरला.
वेदनांची आणि दु:खाची ही ‘प्रणय’व्यथा. ८ मार्चला मुदतपूर्व प्रसृतीने ‘प्रणय’ला आयुष्य वाहिले.जन्मताच त्याचे वजन पावणेदोन किलो. ‘प्रणय’ तसा कमी दिवसांचा आणि कमी वजनाचा. म्हणून त्याची श्वासकोंडी होत गेली.नवआयुष्यातही तो गुदमरत गेला. तेव्हा त्याला सलग १५ दिवस ऑक्सिजन पुरवावा लागला. या प्रवासातच ‘प्रणय’ला नियतीने हेरले.प्रणय झटके देत गेला.तेव्हा जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणाही कौशल्यपणाला लावत गेले. श्वासकोंडीनंतर नियतीने ही बाधा प्रणयच्या डोळ्यापर्यंत नेली. तेव्हा वैद्यकीय यंत्रणाही हतबल झाली. ‘प्रणय’च्या डोळ्यातील पडद्यावर संकटांचे ढग पसरले. तेव्हा शस्त्रक्रियेशिवाय नाही, या निष्कर्षापर्यंत वैद्यकीय यंत्रणा पोहोचली. तेव्हा प्रणयची आई आणि वडील विक्की भोई व्यथीत झाले.
आर्थिक तरतुदीचे आभाळ त्यांच्यावर कोसळले. तेव्हा नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या मनीषा पाटील यांनी ‘प्रणय’ला हात दिला. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या डॉ.नीलिमा सेठिया यांच्याकडे मदत मागितली. तेव्हा सेठियांनी अनेकांना मदतीसाठी फोन केले. तेव्हा लिनेस क्लबच्या लता बनवट यांनी या शस्त्रक्रियेचा भार उचलण्याची तयारी दाखविली. ‘प्रणय’ला गोदावरी रुग्णालयात हलविले. लता बनवटही सरसावल्या. तिथल्या नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.वैशाली पाटील, डॉ.नारखेडेंची चर्चा झाली आणि तान्हुला प्रणय शस्त्रक्रियेला सामोरे गेला.काहीवेळाने ‘प्रणय’ परतला...अंधार दूर सारुन...आनंद विश्व डोळ्यात सामावून...
कमी वजनामुळे डोळ्यातील पडद्यावरच्या रक्तवाहिन्या विकसित होत नाहीत.त्यामुळे डोळ्यातील पडदा गोळा होता. त्यामुळे दृष्टी हरपण्याची शक्यता असते. प्रणयवर दोन टप्प्यात शस्त्रक्रिया होणार आहे. पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यामुळे संकट टळले आहे.
-डॉ.अश्विनी पाटील-नेहते, रेटीना तज्ज्ञ, गोदावरी रुग्णालय.
प्रणयचे दु:ख वेचले गेले. खूप समाधानी आहे. आर्थिक भारापेक्षा सामाजिक जबाबदारी महत्वाची होती. म्हणूनच शस्त्रक्रियेसाठी माणसुकीचा हात दिला.
-लता बनवट, लीनेस क्लब, जळग़ाव.