लोकअदालतमधील तडजोडीने फुलला पुन्हा संसार; ३५०५ प्रकरणे निकाली
By विजय.सैतवाल | Published: March 3, 2024 11:38 PM2024-03-03T23:38:10+5:302024-03-03T23:38:32+5:30
विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने रविवार, ३ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते.
जळगाव : प्रेम विवाह होऊन काही दिवस एकत्र राहिलेल्या दाम्पत्यात मतभेद झाले आणि दोघांनी वेगवेगळे राहण्याचा निर्णय घेतला. यामध्ये घटस्फोटासाठी अर्जही दाखल झाले. त्यात रविवार, ३ मार्च रोजीच्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये हे प्रकरण ठेवण्यात आले होते. मात्र लोकअदालतमध्ये दोघांचेही समुपेदशन करण्यात आले आणि दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने रविवार, ३ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये महिलांचे घरगुती हिंसाचारापासून संरक्षण अधिनियमानुसार दाखल प्रकरणातील पती-पत्नी हे पॅनल प्रमुख न्या. एन. जी. देशपांडे यांच्या समोर आले. २१ एप्रिल २०२२रोजी या पती-पत्नीचा प्रेम विवाह झाला. नंतर दोघांमध्ये मतभेद होऊ लागल्यामुळे त्यांनी वेगवेगळे राहण्याचा निर्णय घेतला.
रविवारी हे दोघे पती-पत्नी राष्ट्रीय लोक न्यायालयात हजर झाले त्यावेळी न्या. एन. जी. देशपांडे यांनी सदर दांपत्यांना वैवाहिक जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले व मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाची अंमलबजावणी करण्याचे पती-पत्नीने ठरविले व सदर प्रकरण आपसात मिटले. तसेच या दाम्पत्यांनी एकमेकाच्या संमतीने दाखल केलेले घटस्फोटाचे प्रकरणही काढून घेत घटस्फोट घेण्याचा निर्णय रद्द केला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एमक्यूएसएम शेख यांचे लोकअदालतसाठी मार्गदर्शन लाभले. न्या. एस. एन. राजूरकर, न्या. बी.एस. वावरे, न्या. एस.आर. पवार, न्या. न्या. जे.जे मोहिते, न्या. पी.पी. नायगावकर, न्या. एन.जी. देशपांडे, न्या. आय.वाय. खंडारे, न्या. आर.आय. सोनवणे, न्या. वसीम देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस.पी. सय्यद, जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. रमाकांत पाटील, उपाध्यक्ष ॲड. अनिल पाटील, सचिव ॲड. कल्याण पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे अधीक्षक सुभाष पाटील व कर्मचारी उपस्थित होते.
३५०७ प्रकरणे निकाली
लोकअदालतमध्ये दाखलपूर्व २६४५ व प्रलंबित ८६२ प्रकरणे निकाली काढण्यात आले. त्यामाध्यमातून १६५ कोटी ६० लाख ३६ हजार ३०१ रुपये वसूल करण्यात आले. तसेच या पूर्वी घेण्यात आलेल्या विशेष ड्राईव्हमध्ये ७०४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. अर्जदारातर्फे ॲड. महेंद्र चौधरी, ॲड. श्रेयस चौधरी, ॲड. हेमंत जाधव, ॲड. सुनील चव्हाण यांनी काम पाहिले.
तीन महिन्यांच्या बाळाच्या अपघाताचा दावा निकाली
तीन महिन्यांच्या बाळाच्या अपघातीमृत्यू संदर्भात मोटार अपघात दावा प्रधिकरणाकडे अपघाती नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल होता. लोकअदालतमध्ये याप्रकरणी चर्चेअंती तीन लाख ५० हजार रुपयांमध्ये दावा निकाली काढण्याचे ठरवण्यात आले. अर्जदारातर्फे ॲड.महेंद्र चौधरी, ॲड. श्रेयस चौधरी, ॲड. हेमंत जाधव, ॲड. सुनील चव्हाण यांनी काम पाहिले.