गोलमाल! दोन ट्रकांची परस्पर विक्री, गुन्हा दाखल
By सागर दुबे | Published: April 12, 2023 01:45 PM2023-04-12T13:45:43+5:302023-04-12T13:45:59+5:30
ट्रकांची परस्पर विक्री केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव: सावदा येथील देविदास सिताराम राठोड यांच्या मालकीच्या दोन ट्रकांची परस्पर विक्री करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरटीओ एजंट शहदाब अली व ब्रिजकुमार प्रकाश यादव (रा.सावदा) यांच्याविरूध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
केळी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे देविदास राठोड यांच्याकडे त्यांच्या मालकीचे एमएच.१९.झेड.६९५५ व एमएच.१९.झेड.७०५५ क्रमांकाचे दोन ट्रक आहेत. त्यातील एमएच.१९.झेड.६९५५ हा ट्रक राठोड यांनी सावद्यातील ब्रिजकुमार यादव यांना विक्री करण्याचे ठरविले होते. यादव याने आरटीओ एजंट शहदाब अली याच्या मार्फत ट्रक खरेदी करण्यास सांगितले. त्यानुसार ३१ जानेवारी रोजी आरटीओ कार्यालयात कागदपत्र जमा करण्यात आली होती.
दरम्यान, १९ फेब्रुवारी रोजी राठोड यांनी विक्री केलेल्या ट्रकचे ऑनलाइन स्टेटस तपासले असता, त्यात त्यांना त्यांचा ट्रक हा अब्दूल राशीद अब्दूल अजीज (रा.मालेगाव) यांच्या नावावर दिसला. तर एमएच.१९.झेड.७०५५ या ट्रकचे स्टेटस तपासल्यानंतर हा ट्रक विक्री केलेला नसताना सुध्दा ब्रिजकुमार यादव यांच्या नावावर दिसला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर राठोड यांनी मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात येवून तक्रार दिली आहे. त्यानुसार ट्रकांची परस्पर विक्री केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.