'साहेब मी शेतकरी बोलतोय'; मुख्यमंत्री शिंदेंच्या सभास्थळी आलेले शेतकरी पिता-पुत्र ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 11:48 AM2023-09-12T11:48:57+5:302023-09-12T11:49:50+5:30
पोलीस निरीक्षक राहुल खताळ आणि कर्मचाऱ्यांनी वेळीच शेतकऱ्याला ताब्यात घेतले.
- महेश कौंडिण्य
पाचोरा (जि.जळगाव) : बैल जोडी विकत घेऊन निघालो असताना पोलीस पथकाने आपल्यावर चुकीची कारवाई केली. याबाबत मुख्यमंत्र्यांसमोर कैफियत मांडू द्यावी, असे बॕनर लाऊन पाचोरा येथे सभास्थळी आलेल्या पिंपळगाव ( पाचोरा) येथील गणेश बडगुजर यांना वडीलांसह पोलिसांनी ताब्यात घेतले. पाचोरा येथे आज मंगळवारी मुख्यमंत्र्यांची सभा होत आहे. तिथे हा शेतकरी आला होता.
या शेतकऱ्याने सांगितले की, आपण बैलजोडी विकत घेऊन निघालो होतो, जरंडी या ठिकाणी पोलीस पथकाने आपल्यावर चुकीची कारवाई केली. याबाबत गुन्हा नोंदवला असल्याची तक्रार केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब यावी म्हणून स्वतःच्या गळ्यात.... साहेब मी शेतकरी बोलतोय... मला बोलायचे आहे.... अशा आशयाचे बॅनर लावले.
बैलांच्या पाठीवर देखील मुख्यमंत्री साहेब मी कोणाच्या फॅक्टरीत तयार होतो का?,अशा आशयाचे बॅनर टाकले असून ही बैलजोडी आणि शेतकरी पिता-पुत्र सभास्थानी दाखल होत असताना पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. परंतु आपणास आत जाऊ देण्यात यावे आणि मुख्यमंत्र्यांसमोर कैफियत मांडू द्यावी, असा आग्रह गणेश बडगुजर यांनी धरला, त्यामुळे सभास्थानाजवळच काही वेळ गोंधळ उडाला. पोलीस निरीक्षक राहुल खताळ आणि कर्मचाऱ्यांनी वेळीच शेतकऱ्याला ताब्यात घेतले.