किराणा दुकानाला भीषण आग, दोन लाखांचे साहित्य जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 05:44 PM2022-11-06T17:44:30+5:302022-11-06T17:47:01+5:30
शेरी येथील मारोती मंदिराजवळ शेनपडू श्रावण पाटील यांचे किराणा आहे. पाटील हे पत्नीसह कार्तिक एकादशीसाठी पंढरपूर वारीला गेले आहेत. त्यामुळे दुकान बंद होते.
मनोज जोशी
पहूर जि. जळगाव - दुपारच्या सुमारास बंद असलेल्या किराणा दुकानाला अचानक आग लागली. यात जवळपास दीड ते दोन लाखांचे किराणा साहित्य जळून खाक झाले. ही घटना रविवारी दुपारी शेरी ता. जामनेर येथे घडली. ग्रामस्थांनी मदतकार्य करीत आगीवर नियंत्रण मिळवले.
शेरी येथील मारोती मंदिराजवळ शेनपडू श्रावण पाटील यांचे किराणा आहे. पाटील हे पत्नीसह कार्तिक एकादशीसाठी पंढरपूर वारीला गेले आहेत. त्यामुळे दुकान बंद होते. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दुकानातून धुराचे लोळ बाहेर पडू लागले.
माजी सरपंच प्रभाकर पाटील, विश्वास पाटील, नवल पाटील व श्रीरंग हिवाळे यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. किराणा साहित्य बाहेर काढण्यासाठी मदत कार्य सुरू केले. पण वाऱ्यामुळे किराणा साहित्य जळून खाक झाले. ग्रामस्थांनी धावपळ करीत आग आटोक्यात आणली. जवळपास दीड ते दोन लाखांचे किराणा साहित्य जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले.