दशक्रियेच्या स्वयंपाकासाठी दिलेले घर आगीच्या भक्षस्थानी; स्वयंपाक सुरू असताना गॅसगळती
By विलास.बारी | Published: August 22, 2023 08:23 PM2023-08-22T20:23:13+5:302023-08-22T20:24:19+5:30
संपूर्ण साहित्य जळाल्याने संसार उघड्यावर
जळगाव : दशक्रिया विधीच्या स्वयंपाकासाठी शेजारच्यांना दिलेल्या घरात स्वयंपाक सुरू असताना गॅसगळती होऊन आग लागल्याने कांचननगरातील सुभाष भाऊलाल बाविस्कर यांच्या घराची राखरांगोळी झाली. यात घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याने बाविस्कर कुटुंबीय उघड्यावर आले आहे. ही घटना मंगळवार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी घडली.
सुभाष बाविस्कर यांच्या शेजारी राहणाऱ्या वृद्धाचे निधन झाले. या वृद्धाचा मंगळवारी दशक्रिया विधी होता. या कार्यक्रमाचा स्वयंपाक करण्यासाठी बाविस्कर यांनी त्यांची खोली शेजारच्यांना दिली होती. तेथे स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅसगळती होऊन काही क्षणातच भीषण आग लागली. यात घरातील सर्व कपडे तसेच संसारोपयोगी साहित्य खाक झाले व संसार उघड्यावर आला.
आजूबाजूच्या नागरिकांनी घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली व नागरिकांनी आपापल्या पद्धतीने पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग एवढी मोठी होती की ती आटोक्यात आली नाही. महापालिकेचा अग्निशमन विभागाचा बंब येईपर्यंत आगीत संपूर्ण घर खाक झाले, असे घरमालकाने सांगितले. आगीबाबत माहिती देताना महिलेला अश्रू अनावर झाले होते. बाविस्कर हे सेंट्रिंगचे काम करतात. हलाखीची परिस्थिती असून ही मोठी दुर्घटना घडल्यामुळे बाविस्कर कुटुंबीय उघड्यावर आले. मदत मिळण्याची मागणी केली आहे. या आगीत शेजारी राहणाऱ्या मीराबाई दगडू माळी यांच्याही घराचे नुकसान झाले.