जकारीया नगरामध्ये घर फोडले, दागिन्यांसह रोकड लांबविली !
By सागर दुबे | Published: April 21, 2023 08:05 PM2023-04-21T20:05:36+5:302023-04-21T20:06:21+5:30
१ लाख ९२ हजाराचा ऐवज लंपास ; पोलिसांची घटनास्थळी पाहणी
जळगाव : सुप्रिम कॉलनी परिसरातील जकारीया नगरामध्ये बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण १ लाख ९२ हजार रूपयांचा ऐवज लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी ५ वाजता उघडकीस आली आहे. दरम्यान, दुपारी घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली असून चोरट्यांचा सुगावा मिळेल, असेही काहीही हाती लागलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जकारीया नगर येथे मोहम्मद अवेस अब्दूल सत्तार हा आई, बहिण व भाच्यासह भाड्याच्या घरामध्ये राहतो. घरासमोर राहणारी आजी मुमताजबी यांचे सुरत येथे निधन झाल्यामुळे रात्री मोहम्मद हा घराला कुलूप लावून कुटूंबियांसह मामा रऊफ खान लुकमान खान यांच्याकडे गेला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ५ वाजता मोहम्मद हा घरी आल्यावर त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला आणि कडी तुटलेली दिसली. घरात प्रवेश केल्यानंतर लोखंडी कपाट फोडलेले होते. त्यातील सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड गायब झालेली दिसून आल्यानंतर चोरी झाल्याची खात्री झाली. त्यानंतर त्याने लागलीच मामा व आईल संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
तसेच पोलिसांनी देखील घटनेची देण्यात आली. पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह अतुल वंजारी, इमरान सैय्यद, सुधीर साळवे, किशोर पाटील, सचिन पाटील, विशाल कोळी आदींनी घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यानंतर दुपारी मोहम्मद याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
असा आहे चोरी गेलेला ऐवज
१ लाख १० हजार रूपये किंमतीची रोकड, २४ हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत, ३२ हजार रूपये किंमतीचे सोन्याची कानातील दोन रिंग, १६ हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी, २ हजार रूपये किंमतीची सोन्याची नथ, ८ हजार रूपये किंमतीची चांदीची पैजण असा एकूण १ लाख ९२ हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.