रक्तबंबाळ झाल्यानंतरही 'तो' भिडला बिबट्याशी; सरपण गोळा करीत असताना केला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 05:57 PM2023-04-30T17:57:06+5:302023-04-30T17:57:24+5:30
सपरण गोळा करीत असतानाच झुडपात दडून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला आणि क्षणातच युवकाला जखमी केले.
कुंदन पाटील
जळगाव: सपरण गोळा करीत असतानाच झुडपात दडून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला आणि क्षणातच युवकाला जखमी केले. रक्तबंबाळ झालेल्या युवकाने मात्र हार मानली नाही. त्याने अंगावर आलेल्या बिबट्याशी झुंज दिली आणि ताकदनिशी त्याला दूरवर फेकले. त्यानंतर भेदरलेला बिबट्याही जंगलाच्यादिशेने पसार झाला. ही घटना तालुक्यातील मन्यारखेडा शिवारात रविवारी सकाळी घडली.
मदन सुखदेव अहिरे (वय २५, रा. मन्यारखेडा ता. जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. मदन आणि त्याचा भाऊ सरपण वेचण्यासाठी शिवारात गेले होते. दोन्ही भाऊ लांबवरच्या अंतरावर काम करीत असतानाच बिबट्याने मदनवर पाठीमागून झडप मारली.बिबट्याने मदनच्या मानेवर पंजे मारले. त्यानंतर बिबट्या आणि मदन समोरासमोर आले.मदनने अंगावर आलेल्या बिबट्याला पूर्ण ताकदनिशी प्रतिकार केला. मदनच्या हातात बिबट्या येताच त्याला उचलून दूरवर फेकले. तेव्हा मात्र बिबट्या भेदरला. त्यानंतर मदनने आरडाओरड सुरु करताच बिबट्या पसार झाला.
दरम्यान, मदनचा मोठा भाऊ राजेंद्र सुकदेव अहिरे (वय २८, रा.मन्यारखेडा) हा क्षणातच घटनास्थळी आला. रक्तबंबाळ मदनला पाहून तोही भेदरला. मदनला आधार देत त्याने तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गाठले. वैद्यकीय यंत्रणेने तातडीने उपचार केल्यानंतर मदनलाही धीर आला. ही घटना कळताच मन्यारखेड्यातील मदनच्या परिवारासह ग्रामस्थांनी रुग्णालयत गाठले. या घटनेमुळे मन्यारखेडा शिवारात भितीचे वातावरण पसरले आहे. हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.