आजीसाठी नातवाने कंस मामाला शिकवला धडा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 07:16 AM2023-04-13T07:16:49+5:302023-04-13T07:18:25+5:30
वारसा हक्काने मालमत्तेसह दागिन्यांची वाटणी झाली, तेव्हा लेकरांना ‘श्रीमंती’ पावली.
कुंदन पाटील
जळगाव :
वारसा हक्काने मालमत्तेसह दागिन्यांची वाटणी झाली, तेव्हा लेकरांना ‘श्रीमंती’ पावली. कालांतराने समाजात ‘उच्चभ्रू’चा मुखवटा मिरविणाऱ्या या लेकरांनी ८० वर्षीय मातेकडे पाठ फिरवली. तेव्हा वृद्धेने लेकीचा दरवाजा ठोठावला. जावयानेही मोठ्या मनाने सासूला आधार दिला. मात्र, मामांच्या शकुनीगिरीला धडा शिकविण्यासाठी नातवाने आजीचा हात धरला आणि तिला प्रशासनाच्या दारात उभं केलं.
तीन मुले आणि एका मुलीची माय असलेल्या सदमाबाईचा (सर्व नाव बदललेले) हा वेदनादायी आयुष्याचा प्रवास. पती हयात असताना लेकरांना मालमत्तेची वाटणी झाली. दागिन्यांचाही हिशेब होताच लेकरांनी मातेला पाठ दाखवायला सुरुवात केली. एक मुलगा आजारी असल्याने इतर दोघांनी तिला आसरा द्यावा, अशी तिची अपेक्षा. मात्र, दोन्ही मुलांनी तिची विनंती धुडकावली, तेव्हा वृद्धेला मुलगी आणि जावयाने आसरा दिला. एरंडोलमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मुलांनी कधी आईची विचारपूसही केली नाही.
मुलांना दाखवला कायद्याचा बडगा
एके दिवशी तिने नातवाला सोबत घेऊन जळगावच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा दरवाजा ठोठावला. उपजिल्हाधिकारी महेश सुधळकर तिच्या वेदना ऐकून अस्वस्थ झाले. ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण कायद्यानुसार मुलांना समजाविले. मात्र, फायदा झाला नाही. शेवटी त्यांनी या निवाड्यावर सुनावणी केली आणि तीनही मुलांसह लेकीवर मातेच्या निर्वाहाची महिनावार जबाबदारी सोपविली. प्रत्येकाने एक महिना आईचा सांभाळ करण्याचे आदेश देण्यात आले.