जळगावमध्ये ‘श्रीं’ना वाहिले श्रीफळ... भंडाऱ्यांना पावले गंगाफळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 05:02 PM2023-09-27T17:02:27+5:302023-09-27T17:10:22+5:30

शहरात ११०० ठिकाणी भंडाऱ्यानिमित्त जेवणावळींचा कार्यक्रम पार पाडल्याचा अंदाज आचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.

A lunch program was organized on the occasion of Ganeshotsav in Jalgaon | जळगावमध्ये ‘श्रीं’ना वाहिले श्रीफळ... भंडाऱ्यांना पावले गंगाफळ!

जळगावमध्ये ‘श्रीं’ना वाहिले श्रीफळ... भंडाऱ्यांना पावले गंगाफळ!

googlenewsNext

कुंदन पाटील

जळगाव : भरताच्या वागे तेजीत असल्याने भक्तांनी यंदा गणरायाला ‘श्री’फळ वाहत भंडाऱ्याच्या पंगतीत गंगाफळाच्या भाजीचा आनंद पेरला. एरव्ही घोटलेल्या वांग्याच्या भाजीला महागाईचे तरंग सुटल्याने शहरातील बहुतांश गणेश मंडळांनी गंगाफळ आणि मिरचीच्या भाजीलाच पसंती दिली.

मंगळवारी आणि बुधवारी शहरात ११०० ठिकाणी भंडाऱ्यानिमित्त जेवणावळींचा कार्यक्रम पार पाडल्याचा अंदाज आचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. त्यातील ३०० भंडारे एकट्या एमआयडीसीत झाल्याचे सांगण्यात आले. यंदा तेल बाजारातही मंदी दिसून आली. त्यामुळे भंडाऱ्यांसाठी ‘तेल’ कुठून आले, याविषयी माहिती जाणून घेतली.अनेक मंडळांनी काही दात्यांकडून तेल उपलब्ध केले. काहीठिकाणी रेशनदुकानदारांनीच तेल पुरविल्याची माहितीही पुढे आली आहे.

गंगाफळ ठरले गोडधोड

दरवर्षी भंडाऱ्यांच्या जेवणावळी घोटलेल्या वांग्याच्या भाजीला पसंती दिली जाते. मात्र यंदा भरताच्या वांग्यांची आवक प्रतिदिन १००० टन सुरु आहे. बाजारातही या वांग्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे सध्या ६० ते ७० रुपये प्रतिकिलोने वांग्यांना भाव आला आहे. भंडाऱ्यासाठी वांगी घ्यायला गेलेल्या गणेशभक्तांचा हिशेब अवाक्याबाहेर जात असल्याचे लक्षात आले. म्हणून त्यांनी प्रतिकिलो १२ ते १५ रुपयांपर्यंत उपलब्ध असलेल्या गंगाफळाला पसंती देत महाप्रसादाच्या पंगती उरकल्या.

मिरची स्वस्त...खवय्या मस्त

यंदा हिरवीही स्वस्त आहे.त्यामुळे बहुतांश गणेश मंडळांनी वरण-भट्टी, भात, गंगाफळाची व मिरचीची भागी, मोतीचूरचे लाडू, शिरा, बुंदीला पसंती दिली. लसूणही महाग असल्याने घोटलेल्या वांग्यांच्या भाजीचा स्वाद यंदा भंडाऱ्यापासून चारहात लांबच राहिला.

केळीच्या पानांना मागणी

बहुतांश मंडळांनी जमिनीवर बसूनच जेवणाची व्यवस्था केली होती. ताट, पत्रावळीऐवजी केळीच्या पानांना पसंती देत पंगती भरतानाचे चित्र सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दिसून आले. बहुतांश मंडळांनी मंगळवारी सायंकाळीच केळीचे पाने उपलब्ध करुन ठेवलेली होती.

Web Title: A lunch program was organized on the occasion of Ganeshotsav in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव