मशिनरी बसविण्यासाठी येणाऱ्या मॅकेनिकलचा रेल्वेतून पडून मृत्यू
By विजय.सैतवाल | Published: May 26, 2024 10:17 PM2024-05-26T22:17:07+5:302024-05-26T22:17:51+5:30
दोन सहकारी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर उघड झाली घटना
जळगाव: जळगाव येथे औद्योगिक वसाहत परिसरातील एका कंपनीत मशिनरी फिटिंगसाठी येणाऱ्या इर्शाद मेहबूब (३०, रा. बाबुली, जि. पानिपत, हरियाणा) या मॅकेनिकलचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार, २५ मे रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास जळगाव ते भादली दरम्यान घडली. या प्रकारणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव येथे औद्योगिक वसाहत परिसरातील एका कंपनीत मशिनरी फिटिंग करायची असल्याने मशिनरी कंपनीचे मॅकेनिकल इर्शाद मेहबूब यांच्यासह त्यांचा शालक समीर व अन्य एक असे तिघे मॅकेनिकल नागपूर येथून रेल्वेने जळगावला येत होते. शनिवारी मध्यरात्री एक वाजेदरम्यान रेल्वे जळगाव ते भादली अप मार्गावर असताना खांबा क्रमांक ४२४/१४ ते ४२४/१५ दरम्यान इर्शाद मेहबूब हे रेल्वेतून खाली पडले व त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती जळगाव रेल्वे स्टेशन प्रबंधकांनी जळगाव तालुका पोलिसांना दिली. त्यानुसार पोहेकॉ अनिल फेगडे व पोलिस नाईक नरेंद्र पाटील यांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दोघे स्थानकावर उतरले व मात्र तिसरा दिसेना
रेल्वे जळगाव स्थानकावर पोहचली व तिघांपैकी दोघे जण येथे उतरले. त्या वेळी इर्शाद मेहबूब हे दिसले नाही. त्यामुळे दोघांनी स्थानकावर त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते सापडत नसल्याने दोघेही सकाळपर्यंत स्थानकावर थांबले. त्या वेळी त्यांना समजले की, रात्री एक जण रेल्वेतून पडला व त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले आहे. त्यामुळे दोघेही रुग्णालयात पोहचले व तेथे मृतदेह पाहताच तो इर्शाद यांचा असल्याचे समजले. इर्शाद हे दरवाजात बसले असावे व त्यांना डुलकी लागून ते खाली पडले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.