महिनाभरानंतर चांदी पुन्हा ९२ हजारांच्या पुढे, दीड हजाराने वाढ; सोने मात्र ३०० रुपयांनी घसरले
By विजय.सैतवाल | Published: July 8, 2024 09:36 PM2024-07-08T21:36:30+5:302024-07-08T21:36:56+5:30
जून महिन्यात घसरण झालेल्या चांदीच्या भावात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पुन्हा वाढ सुरू झाली आहे
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: गेल्या आठवड्यापासून चांदीच्या भावात वाढ सुरू असून सोमवारी (८ जुलै) पुन्हा एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती ९२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. ८ जूननंतर चांदीचे भाव पुन्हा एकदा ९२ हजारांच्या पुढे गेले आहे. दुसरीकडे सोमवारी सोन्याच्या भावात ३०० रुपयांची घसरण होऊन ते ७३ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे.
जून महिन्यात घसरण झालेल्या चांदीच्या भावात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पुन्हा वाढ सुरू झाली आहे. ८ जून रोजी चांदी ९२ हजार २०० रुपये प्रति किलोवर होती. त्यानंतर तिचे भाव कमी-कमी होत गेले व २९ जूनपर्यंत ती ८८ हजार ३०० रुपये प्रति किलोवर आली होती. १ जुलै रोजी २०० रुपयांच्या वाढीने ती ८८ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली. भाव वाढत जाऊन ती शनिवार, ६ जुलैपर्यंत ९१ हजारांवर पोहचली. सोमवारी सुवर्ण बाजार सुरु होताच चांदी थेट ९२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली.
जुलै महिन्यात सोन्याचेही भाव वाढत जाऊन शनिवार, ६ जुलैपर्यंत ते ७३ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. सोमवारी मात्र त्यात ३०० रुपयांची घसरण होऊन ते ७३ हजार ३०० रुपयांवर आले.