पेंटरची स्वयंपाकघरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या, निवृत्तीनगरातील घटना
By विलास.बारी | Updated: May 13, 2023 23:02 IST2023-05-13T23:02:16+5:302023-05-13T23:02:35+5:30
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

पेंटरची स्वयंपाकघरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या, निवृत्तीनगरातील घटना
विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: निवृत्तीनगर येथील हेमंत राजेंद्र चौधरी (३४) यांनी राहत्या घरामधील स्वयंपाक खोलीमध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नसून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला असलेले चौधरी हे पेंटरचे काम करीत होते. शुक्रवारी रात्री जेवण आटोपून चौधरी हे झोपले. मध्यरात्री घरात कुटुंबीय झोपलेले असताना त्यांनी दोरीच्या साहाय्याने स्वयंपाक खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी पहाटे ५ वाजता त्यांची पत्नी गायत्री यांना जाग आली. त्या स्वयंपाक खोलीमध्ये गेल्यानंतर त्यांना पतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. शेजाऱ्यांना ही घटना कळताच, त्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात वाहनातून हलविण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत घोषित केल्यानंतर जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई मंगला, भाऊ विनोद, विवाहित दोन बहिणी, पत्नी गायत्री, मुलगा प्रतीक आणि मुलगी माही असा परिवार आहे.