मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून सुरक्षारक्षकाचा मृत्यू
By सागर दुबे | Updated: April 29, 2023 19:39 IST2023-04-29T19:39:44+5:302023-04-29T19:39:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुसळधार पावसामुळे शिवाजीनगर परिसरातील महावीर जिनिंगची भिंत कोसळून अनोळखी सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ...

मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून सुरक्षारक्षकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मुसळधार पावसामुळे शिवाजीनगर परिसरातील महावीर जिनिंगची भिंत कोसळून अनोळखी सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अद्याप त्या सुरक्षारक्षकाची ओळख पटलेली नाही.
शनिवारी सायंकाळी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचा शहराला जोरदार तडाखा बसला. पाऊस सुरू असताना शिवाजीनगर परिसरातील महावीर जिनिंगच्या संरक्षक भिंतीजवळ एक सुरक्षारक्षक सायकलसह उभा होता. पावसाच्या तडाख्याने अचानक जिनिंगची भिंत कोसळली. या भिंतीच्या ढिगाराखाली दबून त्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. हा प्रकार आजू-बाजूच्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच त्या सुरक्षारक्षकाला ढिगा-याखालून बाहेर काढले. त्यानंतर रिक्षातून जिल्हा रूग्णालयात नेले.
अद्याप त्या सुरक्षारक्षकाची ओळख पटलेली नसून त्यांच्या नातेवाईकांचा शहर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी रविंद्र सोनार हे शोध घेत आहेत. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सुरक्षारक्षकाच्या शर्टावर सत्यनारायण सिक्युरिटी ॲण्ड मॅन पॉवर सिर्व्हीसेस असे लिहिलेले आहे.