जळगावात ज्येष्ठ नागरिकांसाठी आता 'विशेष' ओपीडी
By अमित महाबळ | Published: October 4, 2022 06:21 PM2022-10-04T18:21:23+5:302022-10-04T18:21:55+5:30
जळगावात ज्येष्ठ नागरिकांसाठी आता 'विशेष' ओपीडी मिळणार आहे.
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष ओपीडी सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी वयोमानानुसार होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी केली जाणार असून, बाह्य रुग्ण विभागातील कक्ष क्रमांक १०८ मध्ये ही सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे विशिष्ठ वय उलटून गेले असेल, तर त्यांना केस पेपरचा खर्चही लागणार नाही.
ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्वसाधारणपणे आढळून येणारे रक्तदाब, हृदयविकार, पक्षाघात, गुडघेदुखी, मोतीबिंदू हाडांचे विकार, दुर्धर आजार, तसेच डोळे-कान-नाक-घसा आदींची तपासणी ओपीडीत करून मिळणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी दिली. वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असलेल्या वृद्धांनी आधारकार्ड दाखवल्यास त्यांना केस पेपरचे शुल्क द्यावे लागत नाही.
औषध मिळणार मोफत
रुग्णांची तपासणी झाल्यानंतर बाह्यरुग्ण विभागात मोफत औषधे देण्यात येणार आहेत. राज्यातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अशा प्रकारची ओपीडी आहे. त्या धर्तीवर जळगावमध्येही सुरू करण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार, कार्यालयीन वेळेत सकाळी ९ ते दुपारी १ वाजेदरम्यान आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
तपासणी सुटसुटीत पद्धतीने करणे शक्य
ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या समस्या सातत्याने भेडसावत असतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र ओपीडी झाल्याने तपासणी सुटसुटीत पद्धतीने करता येणार आहे. ज्येष्ठांसाठी सर्वांगीण आरोग्यसेवा देण्याचा पूर्ण प्रयत्न आहे, अशी माहिती जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.