गणेशोत्सवामध्ये जळगावच्या या गावात आजही १३० वर्षांपासूनची अनोखी परंपरा
By अमित महाबळ | Published: September 19, 2023 07:18 PM2023-09-19T19:18:46+5:302023-09-19T19:20:06+5:30
सार्वजनिक मंडळाच्या गणेशाला मानाचा गणपती म्हणून ओळखले जाते. मंडळातर्फे सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येतात.
अमित महाबळ
जळगाव : ब्रिटिशांच्या काळात ऐतिहासिक व औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील मानाच्या गणपतीला १३० वर्षांची अखंड परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला, तेव्हापासून येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गावात सार्वजनिक तथा मानाच्या गणपतीची स्थापना झाल्यानंतरच प्रथेप्रमाणे सायंकाळनंतर गावातील विविध मंडळातर्फे गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष व वाद्यवृंदाच्या गजरात फुलांची उधळण करीत श्रींची जल्लोषात स्थापना करण्यात आली.
सार्वजनिक मंडळाच्या गणेशाला मानाचा गणपती म्हणून ओळखले जाते. मंडळातर्फे सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येतात. गावातील प्राचीन विष्णू मंदिरात मानाच्या गणपतीची स्थापना करण्यासाठी तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनात १८९४ पासून नशिराबाद येथे गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. त्यावेळी सार्वजनिक गणेश मंडळ एकच असल्याने ग्रामस्थ स्वत:हून वर्गणी देत असत. लोकवर्गणीतून दोन ते तीन फूट उंचीची विघ्नहर्ता गणेशाची मूर्ती गावातून घेतली जायची. श्रींच्या स्थापनेची भव्य मिरवणूक काढून विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येत असे.
आजही श्रींच्या स्थापनेची पालखीतून मिरवणूक काढण्याची प्रथा सुरू आहे. यंदा भावेश थोरात यांच्या हस्ते सपत्नीक श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुरोहित केदार भट यांनी मंत्रोच्चार केला. सार्वजनिक तथा मानाच्या गणपतीची स्थापना झाल्यावर गावातील इतर मंडळातील गणपतींची स्थापना करण्यात आली. नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत ५२ मंडळांतर्फे श्रींची स्थापना करण्यात आली.