कंपनीतून परतणाऱ्या कामगारावर धारदार शस्त्राने वार करत केला खून; तिघांना अटक
By विजय.सैतवाल | Published: June 3, 2024 06:57 PM2024-06-03T18:57:01+5:302024-06-03T18:57:21+5:30
वाद घालण्याचा जाब विचारल्याने केला वार
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: कंपनी मधून कामावरून परतणाऱ्या ललित प्रल्हाद वाणी (४५, रा. नाथवाडा) यांच्याशी तिघांनी वाद घालत त्यांच्या मानेवर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला. ही घटना रविवार, २ जून रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनी रस्त्यावरील नाथवाडा परिसरात घडली. घटना उघड झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या दोन तासात संशयित कमल किरण बागडे (२०, रा. कंजरवाडा, जाखनीनगर), हेमंत केशव सपकाळे (१९, रा. तुकाराम वाडी) व युवराज कैलास पाटील (रा. जानकीनगर) या तिघांना अटक केली.
ललित वाणी हे गाडेगाव येथील सुप्रिम कंपनीत नोकरीला होते. रविवारी रात्री ड्युटी संपल्यानंतर वाणी यांना कंपनीच्या वाहनाने ईच्छादेवी चौफुलीजवळ सोडले. ते घराकडे पायी जात असताना नाथवाडा परिसरात हॉस्पिटलच्या बांधकामाच्या ठिकाणी काही तरुणांनी वाणी यांना शिवीगाळ करीत वाद घातला. याविषयी तरुणांना हटकले असता त्याचा राग आल्याने तरुणांनी चॉपर सारख्या धारदार शस्त्राने वाणी यांच्या मानेवर आणि पोटावर वार केले. गंभीर जखमी झालेले वाणी हे काही अंतर चालत जावून वाळूवर कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
सुरुवातीला रस्ता लुटीची शक्यता
मृतदेह ज्याठिकाणी आढळला त्याठिकाणाहून काही अंतरावर बॅग आढळली. त्यामध्ये कंपनीतील टी शर्ट व कंपनीत कामाला लागणारे कटर सापडले. तसेच बॅगवर रक्ताचे डाग पडलेले होते. त्यामुळे सुरुवातीला रस्ता लूट करण्याच्या प्रयत्नातून खून झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात होती.
शेजारील महिलेने पाहिला मृतदेह
वाणी यांच्या शेजारी राहणारी महिला पहाटे फिरायला जात असताना वाळूवर वाणी हे पडलेले दिसले. त्यांनी वाणी यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यांचे कुटुंबीय तेथे पोहचले व हे दृश्य बघताच हंबरडा फोडला. मयत ललित वाणी यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
खुनाची दिली कबुली
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. कंजरवाडा परिसरात रात्रीच्या सुमारास काही टवाळखोर फिरत होते, त्यांनीच हा खून केल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सपोनि आसाराम मनोरे, पोउनि दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, राजेंद्र कांडेलकर, सचिन पाटील, छगन तायडे, विनोद आस्कर, सिद्धेश्वर डापकर, राहुल रगडे, विशाल कोळी, साईनाथ मुंडे या पथकाने कंजरवाड्यातून कमल बागडे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने ललित वाणी हे जात असताना त्यांच्यासोबत वाद झाला. त्यातूनच हेमंत सपकाळे व युवराज पाटील या दोन साथीदारांच्या मदतीने वाणी यांच्यावर वार करीत खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.