लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By विजय.सैतवाल | Published: May 12, 2024 11:35 PM2024-05-12T23:35:14+5:302024-05-12T23:35:32+5:30
मुलीच्या झोक्याच्या दोरीनेच संपविले जीवन : स्वामी समर्थ कॉलनीतील घटना
जळगाव : लग्नाचा पहिला वाढदिवसाचा दिवस आणि तसे मोबाईलमध्ये व्हाट्सअपवर स्टेट्स ठेऊन सकाळी आनंदात असलेल्या कुणाल प्रकाश सूर्यवंशी (२९, रा. दातर्ती ता. साक्री जि. धुळे ह. मु. स्वामी समर्थ कॉलनी, द्वारका नगर परिसर) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवार, १२ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आली आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कुणाल सूर्यवंशी हा तरुण स्वामी समर्थ कॉलनी येथे आई, वडील, पत्नी आणि तीन महिन्याच्या मुलीसह राहत होता. त्याचे शिक्षण सिव्हिल इंजिनिअर झाले असून एका सिमेंटच्या कंपनीत तो मार्केटिंग करायचा. १२ मे रोजी त्याच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे त्याने मोबाईलमध्ये व्हाट्सअपवर स्टेट्स ठेवले होते. सकाळी कुटुंबियांसह अनेकांना तो भेटला तेव्हा आनंदी होता.
दुपारी त्याने राहत्या घरी पलंगाला बांधलेल्या झोक्याच्या दोरीलाच गळफास घेतला. पत्नी त्याला बोलवण्यासाठी गेली त्या वेळी तिला पतीने गळफास घेतल्याचे दिसले. शेजारील मंडळींच्या व पोलिसांच्या मदतीने तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि अनंत अहिरे, पोहेकॉ अनिल फेगडे यांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली.