शिंदे गटाचेही आमदार विजयी, खडसेंचा दारुण पराभव, महाजनांनी २० पैकी १६ जागा जिंकल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 11:38 AM2022-12-11T11:38:02+5:302022-12-11T11:41:22+5:30

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकांसाठी सकाळी ८ वाजल्यापासून निकाल हाती येण्यास सुरुवात झाली.

Aamdar of Shinde group also won, Eknath Khadse lost badly, Girish Mahajan won 16 seats in District milk sangh Election | शिंदे गटाचेही आमदार विजयी, खडसेंचा दारुण पराभव, महाजनांनी २० पैकी १६ जागा जिंकल्या

शिंदे गटाचेही आमदार विजयी, खडसेंचा दारुण पराभव, महाजनांनी २० पैकी १६ जागा जिंकल्या

googlenewsNext

जळगाव - माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातील दूध संघाच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. सहकार क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी समजले जाणारे एकनाथ खडसेगिरीश महाजन या दोघांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. या निवडणुकीत भाजपच्या गिरीश महाजनांची सरशी ठरली असून २० पैकी १६ जागांवर शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, केवळ ४ जागा खडसेंच्या पॅनेलला जिंकता आल्या आहेत. 

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकांसाठी सकाळी ८ वाजल्यापासून निकाल हाती येण्यास सुरुवात झाली. हाती आलेल्या निवडणूक निकालात सुरुवातीपासूनच भाजप पुरस्कृत पॅनेलने आघाडी घेतली होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत खडसे परिवाला मोठा धक्का बसला असून एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचा पराभव झाला आहे. 

मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, भाजपा आमदार मंगेश चव्हाण, शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील हे सर्वच दिग्गज नेते विजयी झाले आहेत. तर, एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे , राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश पाटील या दिग्गजांचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे, एकनाथ खडसेंना हा मोठा धक्का असून गिरीश महाजन यांनी बाजी मारली आहे. 

मंगेश चव्हाण यांच्याकडून मंदिकिनी खडसेंचा पराभव

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचा धक्कादायक पराभव झाला असून भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे मंगेश चव्हाण यांनी आपला चाळीसगाव तालुका मतदासंघ सोडून खडसेंच्या मुक्ताईनगर तालुक्यातून उमेदवारी केली होती. दूध संघाच्या निवडणुकीत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी गिरीश महाजन यांच्या शेतकरी पॅनलकडून उमेदवारी केली होती, त्यांच्या विरोधात खडसेंच्या सहकार पॅनलमधून खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे ही हायव्होल्टेज लढत होती. दरम्यान, चव्हाण आणि खडसे यांच्यात निवडणुकांपूर्वीच मोठे आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले होते. अखेर मंगेश चव्हाण हे विजयी झाले आहेत. 

आत्तापर्यंतचा दूध संघ निवडणूक निकाल 

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत गिरीश महाजन यांच्या शेतकरी पॅनलने खातं उघडलं, महाजन यांचे स्विय सहायक अरविंद देशमुख विजयी, त्यांचे प्रतिस्पर्धी जिल्हा बँकेचे माजी संचालक विजय पाटील पराभूत विजय पाटील

एकनाथ खडसे यांच्या सहकार पॅनलने खातं उघडलं ओबीसी मतदारसंघातून पराग मोरे विजयी, पराग मोरे हे माजी खासदार वसंतराव मोरे यांचे चिरंजीव आहेत, मोरे यांच्या विरोधात गोपाळ भंगाळे उमेदवार होते

भाजपा आमदार संजय सावकारे एससी मतदार संघातून विजयी, प्रतिस्पर्धी श्रावण ब्रम्हे पराभूत

राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छाया देवकर महिला राखीव मतदार संघातून विजयी, महिला राखीव मतदार संघात एकनाथ खडसे यांच्या सहकार पॅनल सोबतच गिरीश महाजन यांच्या शेतकरी पॅनलला एक जागा मिळाली आहे, त्यात पूनम पाटील विजयी झाल्या आहेत

पारोळा तालुका मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील विजयी, त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील पराभूत

धरणगाव तालुका मतदासंघात गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्या शेतकरी पॅनलचे संजय पवार विजयी, त्यांचे प्रतिस्पर्धी वाल्मीक पाटील पराभूत

संजय पवार हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, त्यांनी राष्ट्रवादीऐवजी महाजन-पाटलांच्या शेतकरी पॅनलमधून निवडणूक लढवली होती

अमळनेर तालुका मतदासंघात राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील विजयी, त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ पराभूत

20 संचालकांची निवडणूक

जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार?, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीचे सहकार पॅनल व भाजप-शिंदे गटाचे शेतकरी विकास पॅनलमध्ये जिल्हा दूध संघाचे 20 संचालक निवडून देण्यासाठी थेट लढत होत आहे.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, दूध संघाच्या माजी अध्यक्षा व एकनात खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतदार ठरवणार आहेत.
 

Web Title: Aamdar of Shinde group also won, Eknath Khadse lost badly, Girish Mahajan won 16 seats in District milk sangh Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.