अंगणवाडी सेविकांचा मोर्चा, दोन तास उन्हात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 01:05 PM2019-07-17T13:05:51+5:302019-07-17T13:06:19+5:30
मोबाईल दुरूस्तीचा भुर्दंड नको
जळगाव : अंगणवाड्याच्या आॅनलाईन कारभारासाठी देण्यात आलेल्या मोबाईल दुरूस्तीचा भुर्दंड सेविकांना बसत असल्याने याच्याविरोधासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हाभरातील दोन ते अडीच हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेवर धडक दिली़ दोन तास उन्हात ठिय्या मांडला होता़ लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले़ मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा सेविकांनी घेतला आहे़
संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर, कार्याध्यक्ष युवराज बैसाणे, कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले़ सकाळी अकरापासूनच सेविका, मदतनीस यांची शिवतीर्थ मैदानावर गर्दी जमायला सुरूवात झाली होती़ या ठिकाणी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली़ यानंतर एक वाजेच्या सुमारास नेहरू चौक, टॉवर चौक मार्गे मोर्चा जिल्हा परिषदेवर नेण्यात आला़ रस्त्याने युती सरकार हाय हाय, या सरकारचे करायचे काय खाली डोके वरती पाय, मानधन नको वेतन हवे, अशा विविध घोषणा देण्यात येत होत्या़ यानंतर जिल्हा परिषदेवर भव्य सभेत या मोर्चाचे रूपांतर झाले़
तहानेने व्याकुळ
हजारो सेविकां ठिय्या मांडून बसलेल्या होत्या़ शिवाय घोषणा देऊन देऊन घसा कोरडा पडल्याने अनेक सेविकांना तहान लागली होती़ मात्र, या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने कडक उन्हात त्या तहानेने व्याकूळ होऊन एकमेकींकडे पाण्याची मागणी करीत होत्या़ अखेर काही सेविकांनी जिपच्या पहिल्या मजल्यावर जावून पाण्यासाठी गर्दी केली होती़ या ठिकाणी पाण्याची व्यवस्था हवी होती, असा सूर उमटला़
दोन सेविकांना चक्कर
दुपारी दीड वाजेच्या सुमारास मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला़ यावेळी तीव्र उन्हाचे प्रचंड चटके जाणवत होते़ या भर उन्हात, उकाड्यात या सेविका जिल्हा परिषदेसमोर दोन तास बसून होत्या़ भविष्यातील चटके दूर करण्यासाठी आता काही काळ चटके सहन करा, असे आवाहन रामकृष्ण पाटील यांनी केले़ दरम्यान, तीव्र उन्हामुळे दोन सेविकांना चक्कर येत होते़ त्यांना काही अन्य सेविकांनी महिला बालविकासच्या कार्यालयाबाहेर बसविले होते़
केवळ तेराच अंगणवाड्यांचे समायोजन
जिल्हाभरातील दोन हजाराहून अधिक अंगणवाड्यांचे समायोजन करून त्या बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे त्या बंद करू नये, अशी मागणी करण्यात आली़ यावर शासनाने पुन्हा माहिती मागविली असून आपण केवळ १३ अंगणवाड्यांची माहिती पाठविली आहे़ मात्र, त्याही पूर्णत: बंद होतील असे नाही, त्यामुळे सेविका व मदतनीसांनी निश्चिंत राहावे, असे आश्वासन महिला व बालविकास अधिकारी आऱ आऱ तडवी यांनी दिले़ मोबाईल दुरूस्तीसाठी निधीची मागणी करू, ओळखपत्रांसाठी तालुकास्तरावर काम देऊ, आदी मागण्या शासनस्तरावर पाठवू असे आश्वासन तडवी यांनी यावेळी दिले़ त्यांनी मोर्चकऱ्यांची भेट घेऊनही माहिती दिली़ त्यानंतर दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले़ शिरूड व फत्तेपूर या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळावे, प्रवास भत्ते बिलाची थकीत रक्कम त्वरित अदा करावी, भरतीवरील निर्बंध तत्काळ उठवावे, खडकी येथे सेविकांशी हुज्जत घालण्याविरोधात कारवाई करावी आदी मागण्या मांडण्यात आल्या़ या मागण्यांसंदर्भात शिष्टमंडळाने पंधरा ते वीस मिनिटे अधिकाºयांशी चर्चा केली़ त्यानंतर अधिकाºयांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली़