अबब, टॉझीलीझ्युमॅब इंजेक्शन चार लाखाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:15 AM2021-04-25T04:15:08+5:302021-04-25T04:15:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना संसर्गाच्या काळात रेमडेसिविर, ऑक्सिजन उपलब्ध होणे कठीण झाले असतानाच टॉझीलीझ्युमॅब या इंजेक्शनच्या तुटवड्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना संसर्गाच्या काळात रेमडेसिविर, ऑक्सिजन उपलब्ध होणे कठीण झाले असतानाच टॉझीलीझ्युमॅब या इंजेक्शनच्या तुटवड्याचा गैरफायदा घेत जळगावातील एका रुग्णाला एका दलालाने चक्क दहा पट रक्कम आकारत चार लाखाला या इंजेक्शनची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.
रेमडेसिविर असो अथवा टॉझीलीझ्युमॅब इंजेक्शन सहजासहजी मिळेल याची आता शाश्वती राहिलेलेच नाही. शनिवारी अशाच प्रकारे एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या महिला रुग्णासाठी टॉझीलीझ्युमॅब हे इंजेक्शन लागणार असल्याचे डॉक्टरांनी नातेवाइकांना सांगितले. त्या वेळी नातेवाइकांनी शहरात वेगळ्या ठिकाणी या इंजेक्शनचा शोध घेतला. संपूर्ण शहर पिंजून काढले तरी कुठेही ते इंजेक्शन मिळत नसल्याने अखेर त्यांनी शहरातील विविध राजकीय मंडळींकडे हे इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे यासाठी साकडे घातले. याशिवाय आजूबाजूच्या जिल्ह्यातदेखील संपर्क साधून हे इंजेक्शन मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीदेखील हे इंजेक्शन उपलब्ध झाले नाही.
रुग्णालयाजवळच विचारणा
सर्वत्र फिरून झाल्यानंतर रुग्णालयाजवळ या नातेवाइकांची फिरफिर पाहून एक जण त्यांच्याकडे आला व तुम्हाला टॉझीलीझ्युमॅब इंजेक्शन हवे आहे का? असे विचारले. त्यावर या नातेवाइकांनी होकार दिला असता संबंधित व्यक्तीने ४० हजार रुपये इंजेक्शनची किंमत आहे, मात्र तुम्हाला अत्यंत गरज असल्याने ते ४ लाख रुपयांना मिळेल असे सांगितले. पैसे देतो आगोदर इंजेक्शन दाखवा अशी मागणी केली असता दलालाने त्यास नकार देत अगोदर पैसे द्या इंजेक्शन अस्सल नसल्यास दुप्पट पैसे परत देईल, असा दावा केला. मात्र संबंधित नातेवाइकांनी त्यावर विश्वास न ठेवता हे इंजेक्शन घेणे टाळले.
दलालाकडे उपलब्ध, रुग्णालयात का नाही
टॉझीलीझ्युमॅब हे इंजेक्शन महाराष्ट्रातच उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र रुग्णालयाबाहेर थांबलेल्या दलालांकडे ते उपलब्ध असताना रुग्णालयांकडे ते का नाही, असा सवाल नातेवाइकांकडून उपस्थित केला जात आहे. इंजेक्शन मिळाले असते तर संबंधित रुग्णाची प्रकृती धोक्याबाहेर राहिली असती असेही या नातेवाइकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दलालांची प्रचंड दहशत
टॉझीलीझ्युमॅब या इंजेक्शनसाठी ४ लाख रुपये मागितल्याची माहिती संबंधित व्यक्तीने ‘लोकमत’ला दिली असता अगोदर त्यांनी नाव व प्रतिक्रिया छापण्यासही तयारी दर्शविली. मात्र आपला रुग्ण अजूनही दवाखान्यात असल्याने वृत्तपत्रात नाव आल्यास इंजेक्शन आपल्याला मिळू शकणार नाही, एक दलाल दुसऱ्या दलालाला सांगून कोठेही इंजेक्शन न मिळाल्यास रुग्णाच्या प्रकृतीची काय शाश्वती राहणार, अशी शंकेची पाल या नातेवाइकांच्या मनात चुकली व त्यांनी आपले नाव छापू नये अशी विनंती ‘लोकमत’कडे केली. एकूणच यंत्रणेमार्फत आवश्यक इंजेक्शन, औषधी उपलब्ध होत नसल्याने दलालांकडून ती मिळतात या भावनेने त्यांच्या विरोधात आपले नाव समोरदेखील येऊ नये एवढी दहशत या दलालांची शहरात पसरली आहे.
कारवाई होणार तरी कशी?
शनिवारी रेमडेसिविरचा साठा पकडला गेल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काळाबाजार करणाऱ्यांविषयी तक्रार करावी, असे आवाहन केले आहे. मात्र प्रामाणिकपणे मागणी करूनही इंजेक्शन मिळत नसल्याने तक्रार केल्यास दलालांकडूनही ते मिळणे कठीण होईल, या विचाराने अनेक जण तक्रारी करण्यासाठी देखील पुढे येत नाही.
प्रशासन करते तरी काय?
शहरात रुग्णांच्या नातेवाइकांच्या असहायतेचा एवढ्या मोठ्या प्रमाणात फायदा घेतला जात असताना तसेच थेट रुग्णालय परिसरातच दलाल सक्रिय असताना प्रशासन काय करीत आहे, असा सवाल रुग्णांच्या नातेवाइकांकडून उपलब्ध केला जात आहे.