अबब..जळगाव ते पुणे बसचे तब्बल १९०० रुपये भाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 12:28 PM2020-05-13T12:28:24+5:302020-05-13T12:28:38+5:30
जळगाव : लॉकडाउनमध्ये अनेकांच्या हाताचा रोजगार गेला असताना त्यात महामंडळातर्फे जळगाव ते पुण्यासाठी १९०० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. ...
जळगाव : लॉकडाउनमध्ये अनेकांच्या हाताचा रोजगार गेला असताना त्यात महामंडळातर्फे जळगाव ते पुण्यासाठी १९०० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलाच आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च पासून लॉकडाउन करण्यात आल्याने अनेक नागरिक, विद्यार्थी व यात्रेकरू इतर जिल्ह्यांमध्ये अडकून पडले आहेत. या नागरिकांना त्या-त्या जिल्ह्यांमध्ये सोडण्यासाठी महामंडळ प्रशासनातर्फे मोफत सेवा देणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रवाशांना या मोफत सुविधेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकारी व तहसिलदार यांचे अनुमती पत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, दुसऱ्याच दिवशी शासनाने हा निर्णय मागे घेऊन नवीन काढलेल्या आदेशामध्ये फक्त परप्रांतीय बांधवानांच मोफत प्रवास असल्याचे म्हटले होते. तसेच ज्या प्रवाशांनी गावी जाण्यासाठी महामंडळाकडे नोंदणी केली आहे, अशा प्रवाशंकडून प्रति किलोमीटर ४४ रूपये प्रमाणे भाडे आकारण्याच्या सूचना केल्या होत्या. विशेष म्हणजे परतीचे भाडेदेखील आकारण्याच्या सूचना केल्याने जळगाव ते पुणे एका प्रवाशाला १९०० रुपये भाडे भरावे लागणार आहे. त्यानुसार पुणे आगार आणि जळगाव आगार प्रशासनातर्फे प्रवासाची नोंदणी करण्यासाठी येणाºया प्रवाशांना १९०० रुपये भाडे सांगण्यात येत आहे. हे भाडे ऐकुन प्रवाशांना धक्काच बसत आहे.
अवाजवी भाडे आकारणीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी
दोन दिवसांपूर्वी पुण्याहून एस. टी. महामंडळाच्या बसने काही विद्यार्थी जळगावात परतले. या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १९०० रुपये भाडे आकारण्यात आले. मात्र, कुठल्याही परिस्थितीत घरी जाणे महत्वाचे असल्याने विद्यार्थ्यांनी कुठलाही विरोध न करता, हे भाडे भरुन जळगावी परतले. मात्र, महामंडळाने ऐन लॉकडाउन मध्ये आकारलेल्या अवाजवी भाडे आकारणीमुळे विद्यार्थी व पालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.