पळवून नेलेली मुलगी सोपविली ट्रक चालकाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 02:28 PM2020-05-20T14:28:13+5:302020-05-20T14:28:29+5:30
जळगाव : मदत करण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वाराने पळविलेल्या १३ वर्षाच्या मुलीला मध्यरात्री अमरावती जिल्ह्यात रस्त्यावर मजूर घेऊन जाणाºया ट्रक चालकाच्या ...
जळगाव : मदत करण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वाराने पळविलेल्या १३ वर्षाच्या मुलीला मध्यरात्री अमरावती जिल्ह्यात रस्त्यावर मजूर घेऊन जाणाºया ट्रक चालकाच्या स्वाधीन केले. माणुसकी धर्म जोपासत या ट्रक चालकाने मुलीला रस्त्यावरील लोणी (जि.अमरावती) पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांकडे सोपविले. जिच्यासाठी चार जिल्ह्यात नाकाबंदी झाली, ती मुलगी आपल्या पोलीस ठाण्यात सुखरुप असल्याचे पाहून त्याची माहिती जळगाव पोलिसांना देण्यात आली.
दरम्यान, या घटनेतील संशयित तरुणाचे नाव गणेश बांगर (रा.मालेगाव, ता.वाशिम) असे निष्पन्न झाले असून त्याच्या शोधार्थ जळगाव पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. दरम्यान, तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. पळवून नेलेली मुलगी (वय १३) अल्पवयीन असून ती मुलुंड येथून आई, वडील, भावासह अकोला येथे पायी जात होती. नशिराबाद जवळ एक दुचाकीस्वाराने त्यांना भुसावळपर्यंत सोडतो, असे सांगितले. दोन्ही बहीण व भाऊ हे दुचाकीवर बसल्यावर कुठे जात आहे, असे त्याने विचारल्यावर आम्ही अकोला जात आहे, असे सांगितले. मी सुध्दा अकोला येथे जात असल्याचे दुचाकीस्वाराने सांगितले. त्यानंतर दुचाकी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या पुढे आल्यावर पुढे पोलीस गाडी उभी असल्याने त्याने मुलीच्या भावास खाली उतरवले. तो खाली उतरल्यावर तू पुढे ये मी तेथे थांबतो, पोलिस गाडी गेल्यावर आपण निघू, असे सांगत मुलीस घेऊन दुचाकीस्वाराने धूम ठोकली. मुलाने आई- वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
एस.पी.नी रात्रभर राबविली शोध मोहीम
हा प्रकार उघड झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी डीवायएसपी गजानन राठोड व पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना घटनेची माहिती दिली. डॉ.उगले यांनी तपासाच्या सूचना केल्यानंता अपहारणकर्ता फेकरी टोल नाक्यावरील सीसीटीव्हीत कैद झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डॉ.उगले यांनी अकोला, अमरावती, बुलडाणा व वाशिक येथील पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून नाकाबंदी करण्याच्या सूचना केल्या. वायरलेसवर सर्वत्र मेसेज व फोटो व्हायरल केले. या फोटोवरुन तो गणेश बांगर याचा असल्याचे निष्पन्न झाले. नाकाबंदी सुरु असतानाच बांगर याने लोणीपासून काही अंतरावर मजूर घेऊन जाणाºया ट्रक चालकाच्या ताब्यात दिले व या मुलीला पुढे शहर पाहून सोडा असे सांगून तो फरार झाला. समयसूचकता व परिस्थितीचा अंदाज घेऊन ट्रक चालकाने मायेने मुलीला जवळ घेऊन हकीकत विचारली असता ती प्रचंड घाबरलेली होती. रस्त्यावर पुढे लोणी पोलीस स्टेशनला नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. तेथे या मुलीच्या अपहरणाचा मेसेज आलेलाच होता. त्या पोलिसांनी लागलीच मध्यरात्री जळगाव पोलिसांना मुलगी सुखरुप मिळाल्याची माहिती मिळाली अन् सर्वांचाच जीव भांड्यात पडला.