आभाळमायेनं ‘मन्याड’च्या सेंच्युरीची ‘हॅटट्रिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:20 AM2021-08-27T04:20:06+5:302021-08-27T04:20:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : तालुक्यातील २२ गावांसाठी सिंचनाचे वरदान ठरलेल्या ‘मन्याड’ धरणाने सलग तिसऱ्या वर्षी सेंच्युरी ठोकल्याने हॅटट्रिक ...

Abhyalmaye's 'hat trick' of 'Manyad's century' | आभाळमायेनं ‘मन्याड’च्या सेंच्युरीची ‘हॅटट्रिक’

आभाळमायेनं ‘मन्याड’च्या सेंच्युरीची ‘हॅटट्रिक’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : तालुक्यातील २२ गावांसाठी सिंचनाचे वरदान ठरलेल्या ‘मन्याड’ धरणाने सलग तिसऱ्या वर्षी सेंच्युरी ठोकल्याने हॅटट्रिक साधली आहे. २०१६ मध्ये शतकी सलामी दिल्यानंतर मधली दोन वर्षे वगळता गत तीन वर्षापासून मन्याड ओव्हरफ्लो होत आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे वेळापत्रक कोलमडल्याने २४ दिवस उशिराने १०० टक्के भरल्यानंतर गुरुवारी पहाटे साडेचार वाजता त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहिल्याने मन्याड नदी खळाळली.

गेल्या वर्षी २ ऑगस्ट रोजीच मन्याडच्या नावापुढे शतक झळकले होते. मन्याड ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चौकट

एकूण साठवण क्षमता १९०५ दलघफू

चाळीसगाव तालुक्याच्या पश्चिम शेती पट्ट्याला हिरवळीचा साज देणाऱ्या मन्याडने २२ गावातील सिंचनाखालील शेतीला संजीवनी दिली आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता १९०५ दलघफू असून, मृतसाठा ४८३ दलघफू आहे. उपयोगी साठा १४२० दलघफू आहे.

१...मन्याडच्या सिंचन क्षेत्रात ऊस पिकाला मोठा फायदा होतो. याबरोबरच बागायती कपाशीसह फळबागांनाही या धरणामुळे सुपीकतेचा साज चढला आहे.

२...धरणाचे बुडीत क्षेत्र २ हजार १७७ म्हणजेच ८७१ हेक्टर आहे. त्यापैकी ४८० हेक्टर क्षेत्र लिफ्टवर भिजते.

३...खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात ६ हजार ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते.

चौकट

४७ वर्षात ३२ वेळा ओव्हरफ्लो

१९७४ पासून गत ४७ वर्षात ३२ वेळा मन्याड धरण १०० टक्के भरले आहे.

-१९८७ ते २००१ असे सलग १४ वर्षही ते ओव्हरफ्लो झाले आहे. पुढे २००७ ते २०११ असे सलग पाच वर्षही ते शंभर टक्के भरुन वाहिले.

-२०१२मध्ये यात खंड पडला. २०१३ मध्ये पुन्हा ते ओव्हरफ्लो झाले.

-२०१४ व २०१५ मध्ये दुष्काळी सावट असल्याने मन्याडवरही याचा परिणाम झाला. २०१६ मध्ये पुन्हा मन्याडने सेंच्युरी गाठली.

चौकट

यंदा साधली ‘हॅटट्रिक’

गुरुवारी पहाटे ४.३० वाजता मन्याडने शतकी टप्पा ओलांडत सांडव्यावरून नदीच्या दिशेने झेप घेतली. त्याच्या ओव्हरफ्लोचे हे सलग तिसरे वर्ष आहे. २०१९मध्ये मन्याडला ओव्हरफ्लो व्हायला ऑक्टोबर उजाडला होता. २४ ऑक्टोबर रोजी ते भरले होते. गेल्या वर्षी आभाळकृपा वेळापत्रकानुसार होत होती. यामुळे २ ऑगस्ट रोजीच मन्याडने शंभरीचा झेंडा फडकवला होता.

यंदा पावसाने सारखी ओढ घेतली असून, अजूनही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे; मात्र गत वर्षाच्या तुलनेत २४ दिवस उशिरा का असेना मन्याडने यावर्षीही शंभरी पार केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यावर्षी खरीप हंगामात पावसाने ओढ घेतल्याने निम्म्याने घट येणार आहे; मात्र मन्याड भरल्याने याचा फायदा रब्बी हंगामासाठी होईल. मन्याड परिसरात रब्बी हंगामातील ऊस, फळबाग पिकांना मोठा फायदा होईल. विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ होणार आहे.

महत्वाची चौकट

मन्याडसाठी नदीजोड फायदेशीर, पण मुहूर्त कधी ?

मन्याड धरणाची उंची वाढवावी. यासाठी अधूनमधून आंदोलनांचे मंडप टाकले जातात. तथापि, गेल्या अनेक वर्षापासून या प्रश्नाचा गुंता तसाच आहे. मन्याड धरणात गिरणा धरणातून वाहून जाणारे पाणी नदीजोडद्वारे आणावे, अशीही एक मागणी आहे. ही मागणीदेखील जुनीच आहे. मन्याड धरणाची उंची वाढवायची असल्यास अगोदर नदीजोड प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे, असाही एक मतप्रवाह आहे. गिरणा-मन्याड नदीजोड प्रकल्प झाल्यास गिरणा खोऱ्याला मोठा फायदा होणार आहे; मात्र याला मुहूर्त कधी लागणार? हा प्रश्न कायम आहे.

Web Title: Abhyalmaye's 'hat trick' of 'Manyad's century'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.