अबोली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 04:30 PM2018-07-25T16:30:59+5:302018-07-25T16:31:18+5:30
जळगाव येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आणि साहित्यिक डॉ.उल्हास कडूसकर ‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’साठी ‘रंग प्रेमाचे’ या सदरात प्रेमाच्या विविध छटा व आविष्कार दाखविण्याचा प्रयत्न करणार आहेत. या लेखमालेतील आज पहिला भाग.
प्रणिता : प्रभास, प्रभास,... तुम्ही इथे कसे? इकडे कुणीकडे?
प्रभास : कोण? प्रणिता? तू इथे कशी?
प्रणिता : काय करणार? गाडी लेट आहे ना बरीच? मग बसा वाट पाहत तुम्ही...?
प्रभास : तुम्ही, तुम्ही काय? आपण जुने कलीग्ज आहोत ना वर्गसोबती? मग? अग माझीही गाडी लेट आहे.
प्रणिता : म्हणून इथे कॅटींनमध्ये?
प्रभास : होना? काय करणार? मगाशी मी तुला पाठमोरी पाहिली. तेव्हा वाटलं, बहुतेक प्रणिता आहे.. त्या कोपऱ्यातल्या छोट्याशा देवळापाशी...
प्रणिता : हो, बरोबर, गणपतीचे देऊळ आहे ना, नमस्कार करून घेतला. ते कसे राहील?
प्रभास : जुनी सवय....
प्रणिता : नेहमीची आणि तिथला तो अगरबत्तीचा सुवास
प्रभास : हो तोसुद्धा गुलाब किंवा चंदन अगरबत्ती होना?
प्रणिता : तुझ्या लक्षात आहे अजून?
प्रभास : हो आणि अबोली किंवा बकुळीची फुले वाहायची आणि त्याचा गजरा पण..!
प्रणिता : कमाल आहे तुझी... सगळंच आठवतंय की...
प्रभास : ते राहू दे, पण आता काही तरी थोडंफार खाल्लं पाहिजे. त्या शेवटच्या टेबलवर बसायचं. दोनच खुर्च्या आहेत बघ तिथे.
प्रणिता : हो तुझी सवय कोपºयातलं टेबलच पाहिजे...
प्रभास : हो तुझ्यासाठी काय सांगू? व्हेजीटेबल, सॅण्डवीच ! पचायला हलकं? का आवड बदललीय अलीकडे?
प्रणिता : नाही, नाही ! तेच सांग! आणि तुझ्यासाठी जीरा राईस !
प्रभास : हो, करेक्ट ! (दोेघेही हसतात) काही म्हण प्रणिता पण तू काही बदलली नाहीस, आहेस तशीच आहेस! अॅण्ड इफ आय मे से सो, लुकींग ब्युटीफूल !
प्रणिता : चल! काही तरीच काय! तूही तसाच स्मार्ट आहेस. उलट आणखी रुबाबदार.
प्रभास : तू बेचाळीसची असून, चोविशीची वाटतेस.
प्रणिता : छे ! अरे माझी मुलगी आता इंजिनिअरींगला आहे. बंगलोरला तिलाच भेटायला जायचं फर्स्ट इअर आहे.
प्रभास : आणि मी निघालोय अहमदाबादला कॉन्फरन्सला.
प्रणिता : तुम्ही काय बुवा मोठे बॉस, मॅनेजिंग डायरेक्टर वगैरे असशील ना?
प्रभास : हो...! तू कसे काय ओळखलंस? आणि तू? तू काय?
प्रणिता : आम्ही काय बाई! आम्ही आपले मध्यमवर्गीय! नवºयाच्या पगारात भागत नाही म्हणून नोकरी करायची!
प्रभास : कॉफी सांगू ना- एस्पे्रसो?
प्रणिता : आणि तुझी कॅपुचिनो?
प्रभास : बरोबर.... (एक मिनिट स्तब्ध राहून) प्रणिता....
प्रणिता : काय...?
प्रभास : एक गोष्ट विचारू तुला?
प्रणिता : विचार ना?
प्रभास : तू... तू.... मला तेव्हा विचारले का नाहीस? कॉलेज संपताना...
प्रणिता : कशाबद्दल
प्रभास : लग्नाबद्दल
प्रणिता : म्हणजे? मी.... मी..... तुला?
प्रभास : हो पसंत होतीस! नुसती पसंत नाही, अतिशय आवडत होतीस...!
प्रणिता : अरे ! तू मॅड आहेस का?
प्रभास : हो मी मॅड होतो तेव्हा..!
प्रणिता : तसं नाही? पण मी मी कशी विचारणार? मुली थोड्याच अशी गोष्ट स्वत: पहिल्यांदा विचारतील?
प्रभास : स्वत: नाही तर तुझ्या मैत्रिणीकडून!
प्रणिता : छे ! शक्यच नव्हतं! अरे तू तेव्हा कॉलेजातला एवढा स्मार्ट, हुशार, पॉप्युलर मुलगा, तुझ्या मागे इतक्या मुली... आणि मग तुच का नाही विचारले?
प्रभास : मी? मी? मी घाबरलो.
प्रणिता : तू तुझ्या मित्राकडून विचारायचे !
प्रभास : खरंच कोणीतरी असा चांगला सल्ला देणारा ‘परिचय’ सिनेमातल्या मित्रासारखा भेटायला हवा होता, म्हणजे मी धाडस तरी केलं असतं.
प्रणिता : जाऊ दे आता हे असेच रहायचे होते समज. अबोल अस्फूट....
प्रभास : ओके प्रणिता, आता जाताना बाहेर कुठे तरी अबोलीचा गजरा घेशील ना?
-डॉ.उल्हास कडूसकर, जळगाव